लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील १८ जिल्हे पूर्णपणे अनलॉक करण्याची घोषणा केली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने सविस्तर आदेश येईपर्यंत प्रतीक्षा करणार असल्याचे म्हटले आहे. याबाबत ‘लोकमत’ने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विस्तृत नियमावली प्राप्त होईपर्यंत आहेत ते नियम लागू राहतील, असे म्हटले आहे. तसेच त्यानंतर लगेचच राज्यातील निर्बंध हटवण्यात आलेले नाहीत. नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन आहे. याबाबतची माहिती प्रशासनाकडून तपासून घेऊन त्यानंतर अधिकृत निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे राज्य शासनाने म्हटले आहे.
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये पूर्ण अनलॉक करण्याची घोषणा केली. त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्या १८ जिल्ह्यांच्या यादीत जळगाव जिल्ह्याचाही समावेश आहे. जिल्ह्यात सध्या पॉझिटिव्ही रेट हा पाच टक्क्याच्या खाली आहे. तसेच ऑक्सिजन बेडदेखील २५ टक्क्यांपेक्षा कमीच भरलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अनलॉक केले जाऊ शकते, असा प्रस्ताव आहे. मात्र याबाबत अजून शासनाने कोणतेही सविस्तर आदेश दिलेले नाहीत. फक्त मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत घोषणा केली.
वडेट्टीवार यांच्या घोषणेनंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विस्तृत नियमावली प्राप्त होईपर्यंत आहेत तेच नियम लागू राहतील, असे सांगितले.
राज्य शासनानेही राज्यातील निर्बंध हटवण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनाचा संसर्ग अजूनही थोपवलेला नाही. ग्रामीण भागात अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन निर्बंध शिथिल करायचे किंवा कसे याबाबत निश्चित धोरण करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठवण्यात आलेले नाहीत. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरवण्यात येत आहेत. त्यात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हे निकष आहेत. या निकषांच्या आधारे मार्गदर्शक सूचना अधिसूचित केल्या जातील, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.