लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अंगणात ठेवलेली भांडी व वाळूच्या गोणीला रस्त्याने जाणाऱ्या बैलगाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून सुभाषवाडी (ता. जळगाव) येथे बुधवारी रात्री आठ वाजता दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यात लाठ्याकाठ्या, लोखंडी फावडा याचा वापर झाला. याप्रकरणी गुरुवारी दोन्ही गटांच्या बारा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुंडलिक श्रावण राठोड हा बैलगाडी घेऊन गावातून जात असताना सुभाष उत्तम चव्हाण याची मुलगी अंगणात भांडी घासत होती. त्यावेळी या भांड्यांना बैलगाडीचा धक्का लागला तसेच पुढे ठेवलेल्या वाळूच्या गोणीलाही धक्का लागला. या कारणावरून शाब्दिक वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गट समोरासमोर आले. लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांना मारहाण केली. यावेळी दगडफेकीचीही घटना घडली. या घटनेत पुंडलिक राठोड, गोपीचंद, राठोड ,राजेश श्रावण राठोड, सुनील देवीदास चव्हाण, सुरज सुभाष चव्हाण व सुभाष चव्हाण आदी जखमी झाले.
पहिल्या गटाच्या पुंडलिक श्रावण राठोड यांच्या फिर्यादीवरून सुभाष उत्तम चव्हाण, सुरज उत्तम चव्हाण, मनोज उत्तम चव्हाण,उत्तम सरदार चव्हाण व ईश्वर शिवलाल चव्हाण या पाच जणांविरुद्ध तर दुसऱ्या गटाच्या सुभाष उत्तम चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पुंडलिक श्रावण राठोड, राजेश श्रावण राठोड, नीलेश श्रावण राठोड, श्रावण मांगो राठोड, गोपीचंद भागचंद राठोड, बंटी गोपीचंद राठोड व जितू राठोड यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास हवालदार बळीराम सपकाळे करीत आहेत.