जिजाबराव वाघ
जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव येथे गुरुवारी रात्रभर पावसाने जोरदार बॕटींग केली. त्यामुळे डोंगरी व तितूर नद्यांना यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर आला आहे. शुक्रवारी सकाळी नद्यांचे पाणी शिवाजी घाटासह घाटरोडवरील पुलावरुन वाहू लागले आहे. यावर्षी नद्यांना प्रथमच पूर आला आहे.गेल्यावर्षी ३१ आॕगस्ट ते ३० सप्टेंबर दरम्यान डोंगरी व तितूर नदीला आठ वेळा महापूर आले होते.
ढगफूटी सदृष्य पाऊस झाल्याने गेल्यावर्षी ३१ आॕगस्ट रोजी चाळीसगाव तालुक्यात मोठा हाहाकार उडाला होता. खरीप हंगामासह मालमत्ता व पशुधनाचेही अपरिमित नुकसान झाले होते. यावर्षी मे महिन्यात लोकसहभागातून डोंगरी व तितूर नदीपात्राची स्वच्छता केल्याने पुराचे पाणी संथ गतीने वाहत आहे. मात्र शुक्रवारी आलेल्या पुरामुळे गेल्यावर्षाच्या महापुराच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. तळेगाव व पाटणादेवी परिसरातील डोंगररांगांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने दोघी नद्यांना पहाटे चार वाजता पूर आला आहे. दरम्यान कुठेही फारसे नुकसान झाले नाही. पूरस्थितीवर प्रशासनाचे पूर्ण लक्ष आहे. अशी माहिती तहसिलदार अमोल मोरे यांनी 'लोकमत'ला दिली.