विविध उपक्रमांद्वारे ‘रोटरी’समाजाशी नाते आणखी घट्ट करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:55 PM2018-07-15T12:55:04+5:302018-07-15T13:00:15+5:30
रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा पर्यावरणपूरक तसेच समाजाच्या उत्तम स्वास्थ्याचा संकल्प
जळगाव : समाजाचे आपणकाही देणे लागतो ही भावनाच रोटरी क्लबचा गाभा आहे. त्याद्वारे रोटरी क्लब विविध समाजपोयगी उपक्रम राबवित असते. समाजाशी असलेले हे नाते आणखी घट्ट करण्याठी रोटरी क्लब बंधूभाववाढीसह महिला सक्षमीकरण, गरजूंच्या शिक्षणासह उत्तम आरोग्यासाठीही पुढाकार घेण्याचा मनोदय शहरातील सर्व सहा रोटरी क्लबच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केला.
नवीन रोटरी वर्षात सर्व क्लबच्या नूतन पदाधिकाºयांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर या क्लबचे अध्यक्ष, सचिवांचे चर्चासत्र शनिवारी ‘लोकमत’ कार्यालयात झाले. या वेळी रोटरीचे प्रेसिडेंट इन्क्ल्यू विष्णू भंगाळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन विसपुते, सचिव कॅप्टन मोहन कुलकर्णी, रोटरी क्लब आॅफ जळगाव वेस्टच्या अध्यक्षा संगीता पाटील, सचिव राजेश परदेशी, रोटरी क्लब आॅफ जळगाव ईस्टचे अध्यक्ष रजनीश लाहोटी, सचिव प्रकाश कोठारी, रोटरी क्लब आॅफ जळगाव सेंट्रलचे अध्यक्ष श्यामकांत वाणी, सचिव अॅड. पुष्पकुमार मुंदडा, सुशील राका, रोटरी क्लब आॅफ जळगाव मिडटाऊनचे अध्यक्ष किशोर सूर्यवंशी, सचिव मनोज व्ही. पाटील, रोटरी क्लब आॅफ जळगाव गोल्डसिटीचे अध्यक्ष प्रखर मेहता, सचिव विनायक बाल्दी तसेच रोटरी माध्यम सल्लागार विजय डोहळे उपस्थित होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
एक हेक्टर परिसरात वृक्षारोपण
रोटरी क्लब समाजाची गरज काय हे ओळखून काम करीत असतो. त्यानुसार आताही त्यावर भर राहणार असून पर्यावरणास साथ देत त्याचा समाजालाही उपयोग व्हावा म्हणून शहरातील एक हेक्टर परिसरात वृक्षारोपण करण्याचा मानस असल्याची माहिती विष्णू भंगाळे यांनी दिली. त्यासाठी जागेचाही शोध सुरू आहे. या सोबतच रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, मोफत औषधी वाटप असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आता ट्रक चालकांसाठीही नेत्रतपासणी आयोजित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
एकमेका सहाय करू
रोटरी सेंट्रलतर्फे कानळदा व जळके तांडा येथील शाळा दत्तक घेण्यात आली असून तेथे शालेय साहित्याचे वाटप केले जाते. या शिवाय आरोग्य शिबिर, मोतीबिंदू शिबिर घेण्यात येते. आता ८ आॅगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांचा सत्कार करणे, ग्रामीण भागात शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटप करणार असल्याचे श्यामकांत वाणी यांनी सांगितले. एकमेका सहाय करू या संकल्पनेनुसार बंधूभाव वाढविण्यावर भर राहणार आहे.
रुग्णवाहिकांसाठी रस्ता द्या
रोटरी गोल्डसिटीच्यावतीने शाळांध्ये नवीन विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येऊन नाट्य, स्नेहसंमेलन असे कार्यक्रम घेतले जातात. २७ जुलै रोजी तंबाखूमुक्तीसाठी उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती प्रखर मेहता यांनी दिली. सध्या वाहतुकीच्या कोंडीत रुग्णवाहिका अडकतात. त्यावर उपाय म्हणून ‘रुग्णवाहिकांना रस्ता द्या’ असा जनजागृतीपर उपक्रम राबविला जाणार आहे. या सोबतच प्लॅस्टिकमुक्तीबाबतही जनजागृती करणार आहे.
शहरात ‘मदर मिल्क बँक’ उभारणार
तरसोद गाव दत्तक घेण्यात आले असून तेथे शैक्षणिक, वृक्ष लागवड असे उपक्रम राबविले जातात, अशी माहिती संगीता पाटील यांनी दिली. रोटरी वेस्टच्यावतीने जि.प.च्या १४७ शाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले असून आता महिला सक्षमीकरणावर भर देण्याचा मानस संगीता पाटील यांनी व्यक्त केला. रक्तपेढीच्या धर्तीवर शहरात आता ‘मदर मिल्क बँक’ही सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सोबतच सॅनेटरी नॅपकीन, मतदार जनजागृती मोहीमदेखील राबविणार असल्याचे त्या म्हणाल्या.
प्रत्येक विद्यार्थ्याची रक्तगट तपासणी
रोटरी क्लबचा महिला व मुलांचे प्रश्न सोडविण्यावर अधिक भर राहणार असल्याची माहिती नितीन विसपुते यांनी दिली. महिलांचे मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहे. सोबतच जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी करून दिली जाणार असून व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी उपक्रम राबविणार आहे.
पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर
‘लोकमत’ व रोटरी ईस्टच्यावतीने साधू वासवानी मिशनतर्फे मोफत कृत्रीम हात-पाय वितरण शिबिराचे आयोजन १५ जुलै रोजी करण्यात असल्याचे अध्यक्ष रजनीश लाहोटी यांनी सांगितले. तसेच गरजूंना सायकल, पुस्तके वाटप करण्यासह वृक्षारोपण व जलसंवर्धन अशा पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर राहणार आहे. मुसळी गावात जलसंधारणाचे मोठे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे जलपातळी उंचावली असल्याचेही त्यांनी सांगितले.
विविध क्षेत्रात काम करणाºयांच्या वेदना शमविणार
रोटरी मिडटाऊनच्यावतीने सावखेडा शाळेमध्ये जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. आता फेरीवाले, वाहतूक पोलीस, हमाली काम करणारी मंडळी, सलूनच्या दुकानावरील काम करणारे या सर्वांना सलग उभे राहिल्याने त्यांच्या रक्तवाहिन्यांचा त्रास होऊन पायांच्या वेदना होतात. त्या दूर करण्यासाठी त्यांना आवश्यक साहित्य, औषधी देणे व गरज पडल्यास शस्त्रक्रिया करून त्यांच्या वेदना दूर करण्यासाठी प्रयत्न करणारअसल्याचेतेम्हणाले.
अवयवदान जनजागृती
आज विविध उपक्रमांवर चर्चा होऊन त्यांचा प्रचार-प्रसार केला जातो. तरीदेखील त्यास पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. अशाच प्रकारे अवयवदानाबाबत आजही पाहिजे तेवढा प्रतिसाद नसल्याचे कॅप्टन मोहन कुलकर्णी म्हणाले. त्यामुळे जनजागृती करण्यावर भर देणे आवश्यक आहे.
बांबूच्या रोपांचे वाटप करणार
वनविभागाच्या सहकार्याने रोटरी मिडटाऊन बांबूच्या रोपांचे शेतकºयांना वाटप करणार असल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले. सोबतच एडस्ग्रस्त मुलांना योग्य वागणूक मिळण्यासह त्यांची मानसिकता चांगली राहण्यासाठी त्यांना स्वतंत्र वसतिगृह असणे गरजेचे आहे. ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. या सोबतच उपस्थित पदाधिकाºयांनी नावीण्यपूर्ण उपक्रम राबविणार असल्याची माहिती दिली.