जळगाव : अतिरिक्त शुल्क आकारल्यानंतर पैसे परत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर डॉ. किनगे यांनी सहा महिन्यांपासून रक्कम परत केली नसून ते मानसिक छळ करीत असल्याचा आरोप नशिराबाद येथील दीपक कावळे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार केली आहे.
तक्रारी म्हटल्यानुसार डिसेंबर २०२० मध्ये उषा कावळे यांना कोरोना झाल्याने त्यांना डॉ. किनगे यांच्याकडे दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर शासन नियमानुसार दीड लाख रुपयापर्यंत बिल अपेक्षित होते. मात्र यावेळी डॉ. किनगे व त्याचे मेडिकल व्यवस्थापक गजानन पाटील यांनी ४ लाख ६० हजाराचे बिल काढले. याबाबत कावळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर सुनावणी होऊन २ लाख ४४ हजार रूपये परत करण्याचे आदेश डॉ. किनगे यांना देण्यात आले होते, मात्र, सहा महिन्यांपासून ते फिरवाफिरव करीत असल्याचे कावळे यांनी म्हटले आहे.
उषा कावळे यांचा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह होता. रुग्णाचा मुलगा जास्त पैसे मिळविण्यासाठी हावेपोटी आमच्याविरोधात सतत तक्रार करीत आहे. आम्ही त्यांना एक लाख रुपये परत देण्याचा निर्णय घेतला आहे. दीपक कावळे हा सोशल मीडियावर बदनामी करीत असून त्याचावरच अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॉ. नीलेश किनगे यांनी पोलिसांकडे केली आहे.