परवानाधारक रिक्षामालकांच्या अनुदानासाठी आरटीओची यंत्रणा जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:16 AM2021-05-07T04:16:45+5:302021-05-07T04:16:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरटीओ कार्यालयात जनतेची कामे बंद ठेवण्यात आली आहेत. फक्त अत्यावश्यक सेवेतील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरटीओ कार्यालयात जनतेची कामे बंद ठेवण्यात आली आहेत. फक्त अत्यावश्यक सेवेतील कामे सुरू असून त्यासाठीच कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलेले आहे. त्याचाच भाग म्हणून परवानाधारक रिक्षा मालकांच्या अनुदानासाठी आरटीओची यंत्रणा सतर्क करण्यात आलेली आहे.
कोरोनामुळे रोजगार बंद झाला. बँकेचे हप्ते थकीत झालेले आहे, त्यामुळे संसार चालविणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा मालकांना दीड हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा शासनाने केलेली आहे. जिल्ह्यात अनुदानास पात्र ठरणारे साधारण आठ हजार रिक्षाचालक, मालक आहेत. या रिक्षांचे रेकॉर्ड कागदोपत्री आहे, हे संपूर्ण रेकॉर्ड ऑनलाइन करण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले आहेत. जे रिक्षाचालक पात्र आहेत त्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे अशा रिक्षाचालक-मालक यांची यादी तयार करण्याचे काम आरटीओ कार्यालयात युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी रोज दहा कर्मचाऱ्यांची स्वतंत्र ड्युटी लावण्यात आलेली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू आहे.
यांना मिळणार लाभ
ज्या रिक्षा चालकाकडे प्रवासी वाहतुकीचा परवाना बॅच आहे व त्याचा परवाना ३० मार्चपर्यंत मुदत आहे, अशाच रिक्षाचालकांना शासनाच्या अनुदानाचा लाभ होणार आहेत. जिल्ह्यात तीस हजारांच्या वर रिक्षा आहेत, मात्र परवानाधारक व ३० मार्चपर्यंत मुदत असलेल्या रिक्षांची संख्या आठ हजारांच्या जवळपास असल्याची माहिती आस्थापना प्रमुख सी.एस. इंगळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोट.....
शासनाच्या आदेशानुसार परवानाधारक रिक्षाचालक-मालक यांची यादी तयार केले जात आहे. हे संपूर्ण रेकॉर्ड मॅन्युअली आहे. आता ते ऑनलाइन केले जात आहे. या कामासाठी पंधरा दिवसांपासून दहा जणांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती शासनाला कळविली जाणार आहे.
- सी.एस. इंगळे, आस्थापना प्रमुख, आरटीओ