संजय पाटीलअमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात पंचायत समितीतर्फे होणाऱ्या सर्व बांधकाम आणि इमारती यापुढे एकाच विशिष्ट रंगात दिसणारआहेत. महाराष्ट्रात प्रथमच हा उपक्रम अमळनेर तालुक्यात गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी राबवण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे अमळनेर तालुक्याची आगळी वेगळी ओळख निर्माण होणार आहे.तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २६ शाळांच्या वॉल कंपाऊंडच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. सर्व बांधकामांना मरुन आणिक्रिम रंग देण्याचे आदेश ग्रामसेवक व शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.शासकीय कामात एकसूत्रता यावी आणि शासकीय इमारतींची आगळी वेगळी छाप पडावी म्हणून पंचायत समिती अंतर्गत सर्व विकासकामे ,शासकीय कार्यालये, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे, राज्यस्तरीय आवास योजनेची घरकुले, शाळा इमारती, अंगणवाड्या, शौचालये,वॉल कंपाऊंड, दवाखाना, सामाजिक सभागृह आदींना एकाच प्रकारचे रंग मरून आणि क्रिम रंग लावण्यात येणार आहे. जयपूर शहराची गुलाबी शहर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्याप्रमाणे अमळनेर तालुक्यातील शासकीय इमारतींची ओळख होणार आहे. यापूर्वीदेखील गटविकास अधिकारी वायाळ यांनी बांधावर झाडे लावण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. इमारतींना तसेच विविध विकास कामांना विशिष्ट रंग लावल्याशिवाय घरकुलाचा अंतिम हप्ता, विकास कामांची देयके मिळणार नाहीत, असा इशाराच वायाळ यांनी दिला आहे.
तामिळनाडू येथे प्रशिक्षणला गेल्यावर तेथील शासकीय कामे ठरावीक रंगाची दिसल्याने महाराष्ट्रात प्रथमच अमळनेर तालुक्यात हा प्रयोगराबवण्याचा निर्णय घेतला आहे.-संदीप वायाळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती,अमळनेर