"भगवा कुणाची प्रॉपर्टी नाहीये, त्याच्यावर हक्क दाखवू नका", गुलाबराव पाटलांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 11:27 AM2023-03-27T11:27:45+5:302023-03-27T11:28:08+5:30
मंत्री गुलाबराव पाटील हे त्यांच्या पाळधी येथील निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
- प्रशांत भदाणे
जळगाव : भगवा हा काही कुणाची प्रॉपर्टी नाहीये. तो सगळ्यांचा आहे. त्यामुळं त्याच्यावर कुणीही हक्क दाखवू नये, अशा शब्दांत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मंत्री पाटील हे त्यांच्या पाळधी येथील निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी काल मालेगाव येथे झालेल्या जाहीर सभेत शिंदे गटावर लक्ष करताना जोरदार टीका केली होती. या टीकेला मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. मंत्री पाटील पुढे म्हणाले की, गेल्या आठ महिन्यांपासून उद्धव ठाकरेंनी टीका करण्याशिवाय दुसरं काहीही केलेलं मला पाहायला मिळालेलं नाही. उद्धव ठाकरे पण अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्याकरता काय मार्गदर्शन केलं पाहिजे, कोणते प्रश्न सोडवले पाहिजे, सरकारने काय केलं पाहिजे? याचं त्यांनी मार्गदर्शन करायची अपेक्षा होती. जे झालं ते सर्व जगाला माहिती आहे, असं माझ्या सारख्या कार्यकर्त्याला वाटतं, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांनाही लक्ष केलं. ते म्हणाले की, आता उद्धव ठाकरे यांच्याकडे दुसरा मुद्दा नाही. संजय राऊत हा एकमेव मुद्दा त्यांच्याकडे आहे. राऊत यांनी जे बोलावं त्याची री यांनी ओढावी, असंच या राज्यात चाललं आहे. याचबरोबर, गद्दारांकडून भगवा काय पेलवेल? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. या टीकेलाही गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलंय. भगवा आम्हाला पेलवेल की नाही, हे येणारी वेळ दाखवेल, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर म्हणजे नेहमीच्या पिक्चरला पाच पाच वेळा पाहणं, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला.