लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शनिपेठेतील वाणी मंगल कार्यालयातून दुचाकी चोरुन डिक्कीतील ३० हजारांची रोकड काढून घेत ही दुचाकी निंबायती तांडा येथे कवडीमोल किमतीत विक्री करणाऱ्या दीपक राजेंद्र पाटील (रा.वाल्मीकनगर), रूपेश ईश्वर पाटील (रा.मेस्कोमातानगर), संदीप संजय पवार व नीलेश सुरेश इंगळे (वय २४) (दोन्ही रा. निंबायती, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) चौघांना शनिपेठ पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. दरम्यान, चोरीची दुचाकी घेणाऱ्यालाही यात सह आरोपी करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिनी प्रवीण शिरसाठ (वय ३४, मूळ रा. हातेड, ता. चोपडा) या वाणी मंगल कार्यालयाच्यासमोर वास्तव्याला आहेत. २० फेब्रुवारी सायंकाळी त्यांनी दुचाकी वाणी मंगल कार्यालयासमोर पार्किंग केली होती. दुचाकीच्या डिक्कीत ३० हजार रुपये तसेच राहू दिले होते. चोरट्यांनी शनिवारी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास दुचाकी लांबविली. सकाळी दुचाकी जागेवर नसल्याने त्यांनी परिसरात शोध घेतला परंतु मिळून आली नाही. त्यामुळे शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२४ तासात संशयित जेरबंद
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनी तपासासाठी सहायक पोलीस निरीक्षक अमोल कवळे, हवालदार दिनेशसिंग पाटील, रवींद्र पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे, मुकुंद गंगावणे, इंदल जाधव, रवींद्र बोदडे यांचे पथक नेमले. या पथकाने सीसीटीव्ही व इतर माहिती काढून संशयित निष्पन्न करीत चौघांना अटक केली आहे. दीपक पाटील व रूपेश पाटील यांनी दुचाकी चोरून निंबायती तांडा येथे विक्री केली. चोरीची दुचाकी घेणाऱ्या संदीप पवार आणि नीलेश इंगळे यांनाही सहआरोपी केले आहे. चौघांकडून दुचाकी हस्तगत केली आहे.