चोपडा : तालुक्यातील चुंचाळे येथील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांना नुकतेच अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.याबाबत माहिती अशी की, चुंचाळे येथील हरी जोतिराम पाटील यांचे घराचे बेकायदेशीर बांधकाम व ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेवर अतिक्रमण सुरू असल्याबाबत सरपंच व ग्रामविस्तार अधिकारी यांचेकडे २७ फेब्रुवारी २०१७ रोजी सामाजिक कार्यकर्ते संजय नारायण महाजन यांनी लेखी तक्रार दाखल केली होती.त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांनी प्रस्तुत प्रकरणी चौकशी अहवाल सादर करून त्यात बेकायदेशीर केलेले अतिक्रमण बांधकाम काढून टाकणेबाबत टाळाटाळ केल्याचे प्रथमदर्शनी अहवाल सादर केला होता. सदर अहवालावर विभागीय आयुक्त नाशिक यांच्या समोर वेळोवेळी सुनावणी ठेवण्यात आली होती. त्यावरून नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी चुंचाळे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी अतिक्रमण बांधकाम काढून टाकण्याबाबत टाळाटाळ करून कर्तव्यात कसूर केल्याचे जबाबदार धरीत या प्रकरणी हा निकाल दिला. या ग्रा.पं. मध्ये एकुण १३ सदस्य असून यापूर्वी जात प्रमाणपत्र सादर न केल्याने शांताराम सपकाळे, रजनी सपकाळे, विश्वनाथ बाविस्कर हे तीन सदस्य अपात्र झाले होते.सदर निकालानुसार सरपंच अनिता संजय शिंदे , उपसरपंच मनीषा अतुल पाटील,सदस्य दिवानजी साळुंखे, डॉ. भारती क्षिरसागर, मेघमाला पाटील, सायलिबाई बारेला, नंदलाल चौधरी, रत्नाबाई पाटील व धनराज पाटील हे सदस्य अपात्र झाले आहेत. तर ग्रा. पं. सदस्य संजय महाजन हे मुळ तक्रारदार असल्याने ते पात्र सदस्य आहेत. तालुक्यात संपूर्ण ग्रामपंचायत बरखास्त होणारी ही पहिली ग्रामपंचायत असुन याविषयी चर्र्चेला उधाण आले आहे.
चुंचाळे येथील सरपंच, उपसरपंचासह सर्व ग्रा.पं. सदस्य ठरले अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 10:18 PM