ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 26 - तीन दिवस घरात डांबून ठेवलेल्या सोहेल रिंकू तडवी या दिव्यांग बालकाला देखभालीसाठी धुळे येथे दिव्यांग तसेच मतीमंद मुलांच्या केंद्रामध्ये हलविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या बालकाच्या प्रवेश व इतर खर्चासाठी पोलीस कल्याण निधीतून खर्च करण्यात येणार असल्याचे जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सांगितले. या मुलाला घरात तीन दिवस डांबून ठेवल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर तत्काळ बालकाच्या पित्याला बोलावून समज देण्यात आला व या मुलाला इतरत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस लाईन भागात राहणारे व पोलीस खात्यातून निलंबित असलेले रिंकू तडवी हे त्यांचा मुलगा सोहेल या सहा वर्षीय दिव्यांग बालकाला घरात कोंडून गेले होते. सलग तीन दिवस हा बालक घरातच बंद होता. त्यानंतर जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने या मुलाला जिल्हा रुग्णलायात दाखल केले व आठवडाभरापासून पोलीसच त्याची देखभाल करीत होते. या संदर्भात ‘लोकमत’ने 25 रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर रिंकू तडवी यांना पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आला व या बालकाच्या देखभालीसंदर्भात निर्णय घेण्यात आला. धुळ्य़ाला हलविणारदिव्यांग, मतीमंद मुलांच्या देखभालीसाठी धुळे येथे केंद्र असून तेथे सोहेलला दाखल करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला असून त्यासाठी लागणारा खर्च पोलीस कल्याण निधीतून करण्यात येणार आहे.
सोहेल तडवी या बालकाच्या पित्याला आज समज देण्यात आला असून बालकाला धुळे येथे हलविण्यात येणार आहे. - सुनील गायकवाड, पोलीस निरीक्षक, जिल्हा पेठ पोलीस ठाणे.