चाळीसगाव : कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीत गेले वर्षभर ‘लॉक-अनलॉक’ हा खेळ सुरू आहे. न्यू नॉर्मलही अनुभवले. पुन्हा लॉकडाऊनचा फेरा आवळला गेला. या सर्व घटनाक्रमात मात्र प्राथमिक शाळांचे टाळेबंदीतील ‘कुलूप’ गेल्या १४ महिन्यांत उघडले गेले नाही. या चौदा महिन्यांत मुलांनी ऑनलाइन शाळेचे बोट धरले असले तरी त्याच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या. त्यामुळे यंदाही नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाइनच होणार, ही शक्यता अधिक आहे.
‘सांग...सांग भोलानाथ पाऊस पडेल का, पाऊस पडून शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का’ हे बडबडगीत म्हणत दरवर्षी १५ जूनला मुले शाळेची वाट धरतात. तथापि, कोरोनातील टाळेबंदीतील दीर्घ सुट्टीने मुलांना आता सुट्टीचाच कंटाळा आला आहे. दुसऱ्या लाटेचे रौद्र रूप अनुभवत असतानाच, तिसरी लाट येणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचे आरोग्य विभागाने अलर्ट जारी केलाय. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे.
३१ मेपर्यंत असणारे लॉकडाऊन पुढील १५ दिवस वाढविले जाणार आहे. १५ जून रोजी नूतन शैक्षणिक वर्षाची घंटा वाजते. त्याचे नियोजन १५ मेपासूनच केले जाते. शाळांमध्ये लगबग सुरू होते. यावर्षीही गेल्या वर्षाचा कित्ता गिरवला जाण्याची शक्यता बळावली आहे. मे महिना संपला, तरी शाळांसह शिक्षण विभागातही ‘शांतता’ नांदते आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षातही शाळा ऑनलाइनच भरतात की काय, या प्रश्नाने पालक चिंतित आहे. एकीकडे कोरोनाची भीती, तर दुसऱ्या बाजूला शिक्षणाची अनिश्चितता, अशा दुहेरी कात्रीत पालक वर्ग अडकला आहे.
...............
चौकट
सरसकट ‘पास’चा निर्णय कितपत फलदायी
गतवर्षी टाळेबंदीत कुलूपबंद झालेल्या प्राथमिक शाळा अजूनही बंदच आहेत. गेल्या वर्षाचे मूल्यमापन करताना सरसकट विद्यार्थ्यांना ‘वर्गोन्नत’ करण्यात आले. त्यामुळे शाळेत न जाताही, आपण पास झालोय, ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात तयार झाली आहे.
प्रत्येकी इयत्तेची किमान काही कौशल्ये गृहीत धरली आहेत. ती किती प्रमाणात विद्यार्थ्यांनी आत्मसात केली. याचा धांडोळा मूल्यमापनाद्वारे घेतला जातो. सरसकट ‘पास’च्या निर्णयावर त्यामुळेच अजूनही मत-मतांतरे सुरू आहेत. नियमित शाळा सुरू होऊन प्रत्यक्ष अध्ययन केले जावे, अशी पालकांची इच्छा आहे. मात्र, त्याचवेळी कोरोनाची भीतीही त्यांच्यामध्ये आहे.
..........
चौकट
ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण कुचकामी
शहरी भागातच ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. ग्रामीण भागात तर ते न पोहोचल्यासारखेच आहे.
१...स्मार्टफोनची वानवा
२...कनेक्टिव्हिटी नसणे
३...इंटरनेटच्या सुविधेचा अभाव
४...इतर साधनांचाही तुटवडा
आदी कारणांमुळे ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण कुचकामी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गळतीवरही झाल्याचे उघड झाले आहे.
...........
चौकट
जिल्ह्यात पहिली ते आठवीचे सव्वासहा लाख विद्यार्थी
गेल्या वर्षापासून कोरोनाने जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या ६ लाख २४ हजार २८८ विद्यार्थ्यांची वाट रोखून धरली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षावरही याच सावटाचे ढग गडद झाले आहेत. १५ जूननंतर लॉकडाऊन वाढल्यास नवे शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार, असाही प्रश्न शैक्षणिक वर्तुळात चर्चिला जात आहे.
१...साधारणतः १५ मेनंतर नवी शैक्षणिक पाठ्यपुस्तके तालुकास्तरावर येतात. यंदा मात्र मागणी नोंदवूनही अभ्यासक्रमाची पुस्तके अद्याप दाखल झालेली नाहीत.
........
इनफो
नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून अजूनही स्पष्ट सूचना नाहीत. मध्यंतरी ऑनलाइनचेच संकेत मिळाले होते. मात्र, १० ते १२ जूनच्या दरम्यान नवीन सूचना मिळू शकतात. नवीन पाठ्यपुस्तके अद्याप आलेली नाहीत. पुस्तकांची मागणी मात्र महिनाभरापूर्वीच नोंदविली आहे.
- विलास भोई
प्रभारी गटशिक्षणाधिकारी, पं. स., चाळीसगाव
.....
चौकट
शाळा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची वर्गनिहाय संख्या अशी :
इयत्ता संख्या
पहिली नवीन प्रवेशानुसार
दुसरी ७६, ५१४
तिसरी ७९, ३१३
चौथी ७७, ९१८
पाचवी ८०, ०५०
सहावी ७८, ८२६
सातवी ७७, ३११
आठवी ७७, ६७७
एकूण ५, ४७, ६११