लेखक - प्रा. डॉ. सत्यजित साळवे.
नुसता शाळा शब्द उच्चारला तरी आठवणींचा गलका होतो. शाळा ही आयुष्यातील एक अपूर्व ठेव आहे. शाळा म्हटलं की आठवणींची शिदोरी आपोआप सुटू लागते. शाळेचे प्रांगण, इमारत, झाड-वेली हा गोतावळा मनात रुंजी घालू लागतो. मास्तर -गुरुजी आणि सर असा प्रवास झालेल्या गुरूंचे एक-एक शब्दचित्र आणि व्यक्तीचित्र डोळ्यासमोर उभे राहते. मायाळू, कणखर कडक शिस्तीचे आणि हाडाचे शिक्षक यांच्या गोष्टी स्मरू लागतात. शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वांग सुंदर शब्द आहे; याबाबतीत पृथ्वीतलावरच्या
कोणत्याही मानव प्राण्याचे दुमत असण्याचे कारण नाही.
माझ्याबाबत शाळा हा विषय अत्यंत धन्यता देणारा आहे. शाळा नुसती अनुभवली नाही, तर ती जगलो; असे अभिमानपूर्वक सांगतो. बऱ्याचदा मित्रांमध्ये गप्पा मारताना म्हणत असतो; नर्सरीतील ती निरागस, गोंडस बालके पाहिली की माणूस सर्व दुःख, ताणतणाव क्षणात विसरून जातो. ती बालके जेव्हा एका सुरात कविता-गाणी गाऊ लागतात, तेव्हा जगातील सर्वात सुमधूर स्वर कानी पडतो. त्या आवाजाने मन पुलकित होते, उल्हासित होते.
शाळा आठवण्याचं कारण महिन्या दोन महिन्यापूर्वी शाळेतील मित्र-मैत्रिणींनी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. त्या ग्रुपवर "बालपणीचा काळ सुखाचा..." या अशा आनंददायी-चैतन्यदायी आठवणींचा उजाळा होऊ लागला आहे. तो कुठे आहे? ती सध्या काय करते ?अशा प्रश्नांचा तळ लावण्यात साऱ्यांचा दिवस साजरा होतो आहे. माझी शाळा आठवली की पिंप्री गाव नजरेसमोर उभा राहतो. कौलारू व पत्रांची अशी संमिश्र बांधण्याची जुनी इमारत दिसते. शाळेसमोरच्या छोट्याशा प्रांगणात अगदी शाळेच्या व्हरांड्यालागून असलेली मोगऱ्याची ती सुवासिक वेल अवतीभवती दरवळत राहते. इंगळे हे कडक शिस्तीचे गुरुजी पाठीमागे उभे असल्याचा भास होतो. पांढरा स्वच्छ पायजामा आणि नेहरू शर्ट...मोठे-मोठे डोळे आणि सरळ नाक...कानांवर आणि भुवयांवर लोंबत असलेल्या केसांच्या लांबच लांब पारंब्या... काळ्या सावळ्या रंगाची गुरुजींची प्रतिमा कायमची मनात कोरली गेली. गुरुजी कसे असतात? असे म्हटल्याबरोबर इंगळे गुरुजींची प्रतिमा डोळ्यासमोर येते.
या शाळेचे हेड गुरुजी म्हणजे व्यंकट गुरुजी... पांढरा नेहरू शर्ट आणि पांढरे स्वच्छ धोतर गुरुजी नेसत असत. व्यंकट गुरुजींचे शिकवणे खूप भारी होते. शाळेच्या दिवसात पहिला मित्र भेटला... दगडू उमराव लोंढे..! या मित्राने माझ्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव टाकला आहे. पिंप्री
गावाजवळून एरंडोलकडे जाणाऱ्या रस्त्यालाच कोपऱ्यावर दगडूचे घर होते. घर कसलं छोटीशी झोपडी होती...! अठराविश्वे दारिद्र्यात जन्माला आलेला दगडू आमच्या इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंतच्या वर्गात सर्वात हुशार विद्यार्थी होता. वडील गुराढोरांचे केस
भादरण्याचे काम करायचे. त्या केसांपासून गुराढोरांच्या गळ्यात बांधण्यासाठी केसुण्या बनवायचे. धरणगाव रोडला रस्त्याच्या बाजूला ते विकण्यासाठी व चपला-जोडे शिवण्यासाठी दुकान लावून बसायचे. आजही मी ज्या-ज्या वेळेस पिंप्री गावावरून जातो, त्या-त्या वेळेस दगडूच्या घराकडे पाहतो. आज तिथे नवनव्या कॉलन्या वसलेल्या दिसतात; पण का कोण जाणे... आजही मला दगडूची झोपडीच त्या जागेवर उभी असलेली दिसते.
उंचीने ठेंगणा म्हणजे बुटका असणारा दगडू शाळेत ऐटीत यायचा. पांढरा सदरा, खाकी हाफ पॅन्ट, मस्त शर्ट इन केलेले... कमरेला चमकदार काळा रंगाचा पट्टा त्यावरची नक्षी काम केलेले. पायात काळ्या रंगाचे बूट -पांढरे पायमोजे अशा ऐटीत येणाऱ्या लहानशा दगडूला पाहून साऱ्यांना अप्रूप वाटायचे. घरातील दारिद्र्याचा- गरिबीचा लवलेश त्याच्या राहणीमानात डोकावत नसे. दगडूची आई आणि तीन बहिणी, वडील असा मोठा परिवार त्या झोपडीत राहत.
इयत्ता तिसरीमध्ये असताना दगडूच्या आईचं निधन झालं. वर्षा दोन वर्षांनी दोन मोठ्या बहिणींचे निधन झाले आणि नंतर वडील गेले. या धक्क्यातून दगडू सावरलाच नाही. परिस्थितीच्या दाहक चटक्यांनी आणि जवळच्या माणसांच्या अकाली जाण्याने दगडू
कोसळून पडला. चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण होणारा दगडू...पुढे दहावी नापास झाला. सुरतला जाऊन काम धंदा करू लागला. नियतीवर माझा विश्वास नाही; पण दगडुच्या वाटेला आलेली ही होरपळ म्हणजे हुशार मित्रावर नियतीनं केलेला घोर अन्यायच आहे, असं प्रकर्षाने वाटू लागते. शाळा आणि धडा यांची उजळणी करताना, शाळा सुखद आठवणींचा गोतावळा आहे; पण आयुष्यातील खरा धडा शाळाच तर देत असते; पण दगडूच्या आयुष्यातील शाळा ऐन उमेदीच्या काळात हरवली ही हूरहूर कायम मनाला लावून आहे. म्हणून कुणाच्याच आयुष्यातील शाळा कधीच हरवू नये. शिकून मोठं होण्याचं कुणाचंही स्वप्न काळाने हिरावून नेऊ नये.