जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय ६ मार्चपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 06:41 PM2021-02-22T18:41:15+5:302021-02-22T18:41:37+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : आठवडेबाजारही राहणार बंद जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय २२ ...
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : आठवडेबाजारही राहणार बंद
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय २२ फेब्रुवारी ते ६ मार्चपर्यंत बंद राहणार असून तसे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी दिले. शाळा महाविद्यालय बंद राहणार असले तरी या काळात असणाऱ्या परीक्षा घेण्यास सूट देण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयांसोबतच शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी क्लासेस, सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद राहतील.
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाच्यावतीने उपाययोजना केल्या जात असून यामध्ये गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतल्यानंतरही नागरिकांकडून हवे तसे नियमांचे पालन होत नसल्याने संसर्ग वाढत आहे. त्यामुळे असाच संसर्ग वाढत राहिल्यास शाळा-महाविद्यालय बंद करण्याचे संकेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले होते. तसेच नियमांचे पालन न केल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला होता.
अखेर जिल्ह्यात बहुतांश घटकांवर निर्बंध लावण्यात आले असून यात शाळा-महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी काढले. या सोबतच जिल्ह्यातील आठवडे बाजारही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. या सोबतच सिनेमागृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, बगीचे बंद ठेवण्याचेही आदेश दिले आहे. निदर्शने, मोर्चे यांच्यावरही बंधने आणले असून उपस्थिती मर्यादीत करण्यात आली आहे.