जळगाव : खान्देशातील शेतजमीन नापिकीकरण थांबवण्यात आणि ग्रामीण भागातील दुष्काळ निवारणसंबंधी शास्त्रशुद्ध भूजल व्यवस्थापन अभ्यास ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र प्रशाळेतील समन्वयक डॉ.एस.एन.पाटील यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ जिऑलॉजीस्ट ॲण्ड हैड्रोजिओलॉजीस्ट(जियो-फोरम) औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दुष्काळातून मुक्ततेसाठी भूविज्ञानाचे महत्त्व, या विषयावर राष्ट्रीयस्तरावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय वाळवंट आणि दुष्काळ जागरुकता दिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या वेबिनारचे उद्घाटन विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे निदेशक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, हवामान शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद मुजुमदार आणि जियो फोरमचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला प्रा.बी.व्ही.पवार यांनी उद्घाटन करताना भूजल संवर्धन ही जनचळवळ व्हावी, असे मत व्यक्त केले.
भूविज्ञानाचा प्रसार आणि प्रचार होणे गरजेचे
गुजरात येथील भूजल विद्यापीठातील भूशास्त्रज्ञ प्रा.महेश ठक्कर यांनी कच्छ वाळवंटात पाणी टंचाई कमी करण्यात भूशास्त्रज्ञ आणि पर्यावरणप्रेमी यांनी मोलाची भूमिका बजावली, असे सांगितले. जियो-फोरमचे उपाध्यक्ष प्रा.अशोक तेजनकर यांनी राष्ट्रीय स्तरावरील वाळवंटीकरण रोखण्यासाठी व दुष्काळातून मुक्त होण्यासाठी भूविज्ञानाचा प्रसार आणि प्रचार होणे गरजेचे आहे, असे आवाहन केले. जियो-फोरमेच संस्थापक सचिव डॉ.पी.एस.कुलकर्णी आणि बेविनारचे उपसमन्वयक प्रा.एस.टी.इंगळे यांनी पर्यावरण संशोधनाबाबत विचार मांडले. डॉ.वि.मा.रोकडे यांनी आभार तर डॉ.एस.बी.अत्तरदे यांनी सूत्रसंचालन केले. या वेबिनारमध्ये १०७ जणांनी सहभाग घेतला.