लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे कडक निर्बंध असताना शुक्रवारी व शनिवारी मनपा अतिक्रमण विभागाने केलेल्या पाहणीत सात व्यावसायिक चोरून-लपून व्यवसाय करतांना आढळून आले. या व्यवसायिकांच्या दुकानांना मनपा अतिक्रमण विभागाने सील ठोकले. कारवाई दरम्यान काही व्यावसायिकांनी अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला.
शनिवारी सकाळी फुले मार्केट, बळीराम पेठ, महात्मा गांधी मार्केट, चित्रा चौक व जयकिसन वाडी येथे कपडे व इतर खाद्य पदार्थ व्यवसायिक दुकानांमध्ये ग्राहकांना प्रवेश देऊन बाहेरून शटर बंद करून आत मध्ये व्यवसाय करतांना आढळून आले. हा प्रकार मनपाच्या कर्मचाऱ्यांना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना दुकाना बाहेर काढून दुकाने सील केली.
इन्फो :
भाजीपाला विक्रेत्यांच्याही हातगाड्या जप्त
यावेळी मनपा अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना शहरातील जुने बस स्टँड, टॉवर चौक, फुले मार्केट या भागात काही भाजीपाला विक्रेते रस्त्यावर गाड्या लावून व्यवसाय करताना आढळून आले. मनपा अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभरात १० ते १२ विक्रेत्यांच्याही हातगाड्या जप्त केल्याचे सांगण्यात आले.