फोटो - १९ सीटीआर ३३
सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहर व परिसरातील निर्जन स्थळे गुन्हेगारांचे अड्डे बनली असून अशा ठिकाणी लूटमार व महिलांच्या छेडछाडीचेही प्रकार घडत आहेत. अशा ठिकाणी पेट्रोलिंग होत असली तरी गुन्हेगार पोलिसांची नजर चुकवून गुन्हे करत आहेत.
शहरातील पिंप्राळा रेल्वेगेटजवळील मोकळे मैदान, कोल्हे हिल्स परिसर, मेहरूण तलाव परिसर, सुप्रिम कॉलनी, श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान परिसर, शिरसोली नाका, शिवाजी उद्यान परिसर, गेंदालाल मिल, तांबापुरा, समतानगर, जिल्हा रूग्णालय परिसर, म्हसावद रस्ता आदी ठिकाणी बसून गुन्हेगार दारू रिचवतात आणि रात्री चो-या, घरफोड्या, रस्ता लूट करतात तसेच छेडखानीचेही प्रकार घडतात. अशा ठिकाणी पोलिसांनी रात्रीची पेट्रोलिंग वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
फिरायला जाताय...काळजी घ्या...
मेहरूण तलाव परिसर, कोल्हे हिल्स परिसर तसेच पद्मालय तसेच कांताई धरण याठिकाणी मोठ्या प्रमाणात तरूण मंडळी व नागरिक फिरण्यासाठी येत असतात. याचाच फायदा घेऊन रस्त्यात नागरिकांना अडवून चोरटे लुटमार करतात. त्याचबरोबर नवीन बस्थानकात सुध्दा चोरट्यांनी धुमाकूळ घातला. आहे. गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढणा-या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरून नेण्याचेही प्रकार वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.
रात्री पायी फिरणेही ठरतेय घातक
शहरातील काही ठिकाणी पायी फिरणेही घातक ठरत आहे. आतापर्यंत पिंप्राळा रस्ता, कासमवाडी आठवडे बाजार परिसर, शिवतीर्थ मैदान परिसर, रिंगरोड, मेहरूण तलााव, खोटेनगर, रामानंदनगर स्टॉप, शिरसोली रस्ता, प्रेमननगर, डीमार्ट परिसर, दुध फेडरेशन परिसर आदी ठिकाणी पायी चालणा-या तरूणांच्या हातातून हातातून मोबाईल तर महिन्यांच्या गळ्यातून सोनसाखळी लांबविण्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाजीनगर रेल्वे गेटजवळ काही दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वाराला मारहाण करून काही तरूणांनी लुटले होते.
चौक व गल्लीबोळ बनल्या मिनीबार
सायंकाळ झाली की शहरातील काही चौकांना व गल्लीबोळांना मिनीबारचे स्वरूप येते. जिल्हा रूग्णालय परिसर, भजे गल्ली तसेच रामानंदनगरातील गिरणा पाण्याची टाकी परिसर तसेच गेंदालाल मिल व तांबापुरा भागात सूर्य मावळला की तळीरामांची जत्रा भरते. चायनीज, अंडे तसेच भजे अशा खाद्यपदार्थाच्या हातगाड्यांवर दारूच्या बाटल्यासह पाण्याच्या ग्लासची व्यवस्था देखील केली असते. काही अनेकजण या हातगाड्यांजवळ उभे राहून बाटली रिचवितात. काहीवेळा मद्यपींमध्ये वाद होवून हाणामारीच्या घटनाही घडतात. तर काही मद्यपींकडून रस्त्यावरून ये-जा करणा-या नागरिकांना त्रास दिला जातो.
नियमित होते पोलिसांकडून तपासणी
ज्या ठिकाणी वारंवार लूटमारीच्या घटना घडत आहेत, अशा ठिकाणांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. या परिसरात रात्रीतून एकदा किंवा दोनदा पेट्रोलिंग केली जाते. तसेच गुन्हेगार राहत असलेल्या भागांमध्ये नियमित पोलिसांनाकडून भेटी दिल्या जातात. तसेच तो गुन्हेगार घरात आहे की नाही याची खात्री सुध्दा केली जाते. त्याचबरोबर मध्यरात्री चौका-चौकात पोलिसांनाकडून नाकाबंदी केली जाते. याठिकाणी वाहनांची तपासणी केली जाते.