आॅनलाईन लोकमतजळगाव दि,७: यावल येथील लाच मागितल्याच्या एका प्रकरणात यावल पोलीस स्टेशनचे तत्कालिन कर्मचारी कैलास नारायण इंगळे यालाही मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सकाळी अटक केली. किरण पांडुरंग ठाकरे या कर्मचाºयाला सोमवारी सायंकाळी अटक झाली होती. याच गुन्ह्यात आरोपी असलेले यावलचे तत्कालिन तथा जिल्हा विशेष शाखेचे विद्यमान पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना मात्र अद्याप अटक झालेली नाही.
गुन्हा दाखल न करण्यासाठी यावल येथे २१ जानेवारी रोजी तत्कालीन पोलीस निरीक्षक बळीराम विठ्ठल हिरे, कर्मचारी किरण ठाकरे व कैलास इंगळे यांनी ८० हजार रुपये घेतले. त्याआधी १३ जानेवारी रोजी ४० हजार रुपये घेतले. २३ जानेवारी रोजी प्रत्येकी दहा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल मागितल्याचा आरोप आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत लाच मागितल्याचे सिध्द झाले होते. या पडताळणीत संशय आल्याने तक्रारदाराकडील व्हाईस रेकॉर्डर हिसकावून त्याची तोडफोड करुन पुरावा नष्ट केला होता. त्यामुळे या तिघांविरुध्द यावल पोलीस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ७ भादवि कलम २०१ व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००चे कलम ६६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंगळे स्वत:हून एसीबी कार्यालयात हजरअटकेची टांगती तलवार कायम असल्याने कैलास इंगळे मंगळवारी सकाळी स्वत:हून लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजर झाले. त्यानंतर साडे अकरा वाजता अटक करुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या डायरीला तशी नोंद करण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकिय तपासणी केल्यानंतर इंगळे यांना भुसावळ येथे न्यायालयात नेण्यात आले. तेथील न्यायालयाने अटकेतील दोन्ही पोलिसांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावली हिरेंसह तिघांच्या घराची झडतीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्यासह अटकेतील पोलीस कर्मचारी कैलास इंगळे व किरण ठाकरे यांच्या घराची झडती घेतली, मात्र त्यात काहीही आढळून आले नाही. हिरे यांचे घर नाशिक येथे आहे तेथे त्यांच्या घराची झडती स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतली तर इंगळे व ठाकरे यांची जळगावातील घराची झडती घेण्यात आली. तिघांच्या घरातून काहीही हाती लागले नाही, अशी माहिती उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांनी दिली.