बियाणे विक्री नियंत्रणाची भरारी पथके नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:13 AM2021-06-01T04:13:07+5:302021-06-01T04:13:07+5:30
चोपडा : जिल्ह्यात अनधिकृत कापूस बियाण्यांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात झाला. त्यात जी भरारी पथके नियुक्त केली होती ती केवळ ...
चोपडा : जिल्ह्यात अनधिकृत कापूस बियाण्यांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात झाला. त्यात जी भरारी पथके नियुक्त केली होती ती केवळ देखावा ठरत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात फक्त दोन कारवाया झाल्या, हा अपवाद वगळता इतर भागात कुठेही कारवाई सत्र राबवलेले नसल्याची नाराजी शेतकरी संघटनेने व्यक्त केली आहे.
बियाणे व खते पुरवठासंबंधी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे नियंत्रण असते या विभागात मोहीम अधिकारी हे स्वतंत्र पद अनधिकृत बियाणे खते व कीटकनाशके विक्री व खरेदी यासंबंधी निर्माण केलेले आहे; पण या विभागाकडून कुठेही कारवाई झालेली नाही. गेल्यावर्षीदेखील असाच प्रकार यंदा कापूस बियाण्याचा लाखो रुपयांचा काळाबाजार चोपडा, यावल, रावेर मुक्ताईनगर, जामनेर, अमळनेर, पाचोरा, पारोळा तसेच चाळीसगाव या भागात अजूनही चालू आहे. असे असताना फक्त दोन-तीन कारवाया करायच्या व शांत बसायचे, अशी परिस्थिती कृषी विभागाची आहे. पन्नास अवैध कापूस बियाण्याची पाकिटे मध्यंतरी जप्त केली होती.
कोरोनाचे कारण
कृषी विभागाकडे अनेक प्रलंबित फायली असल्याचे कारण तसेच कोरोनाचे कारण पुढे करून कारवायांना टाळाटाळ करण्यात येत आहे. तालुक्यातील कृषी अधिकारी म्हणतात, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी येत नसल्यामुळे आम्हाला कोणावरच कारवाई करता येत नाही. प्रशासनावर वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने हे सर्व सुरू आहे. वाहनांची उपलब्धता कमी आहे. त्याची मागणी रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगरमध्ये भरपूर आहे. या बियाण्याचा पुरेसा पुरवठा करून घेण्यासाठी कार्यवाही सुरू आहे की नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
* * * * * * * * *कृषी यंत्रणेचा कानाडोळा:-
खतांच्या दरात वाढीव विक्रीची प्रकरणे आहेत; पण तक्रारीची प्रतीक्षा कृषी यंत्रणा करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. युरिया दाणेदार खते यांच्यावर लिंकिंगचे आतापासून प्रकार सुरू झाले आहेत. एका कापूस बियाणे निर्मिती कंपनीकडून लिंकिंगचे प्रकरण चालू झाले आहे. ती कंपनी बियाणे वितरकांना लिंकिंगमध्ये देत असल्यामुळे वितरक विक्रेत्यांना लिंकिंग देत आहेत व शेतकऱ्यांनाही ते बियाणे लिंकिंगमध्ये घ्यावे लागत आहे. याकडेही कृषी विभागाचा कानाडोळा आहे. कृषी विभागाने वेळीच या सर्वांवर लक्ष केंद्रित करून आळा घालावा. अशी शेतकरी संघटनेतर्फे मागणी करण्यात येत आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष संजय महाजन, उपजिल्हाध्यक्ष किरण गुजर, सचिन शिंपी चोपडा, अखिलेश पाटील भडगाव, मंगेश राजपूत अमळनेर, खुशाल सोनवणे एरंडोल, जीवन चौधरी यावल, नामदेव महाजन पाचोरा, सय्यद देशमुख जळगाव ग्रामीण, नंदलाल पाटील धानवड आदी उपस्थित होते.
——
दरवर्षी कापूस बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी शासन भरारी पथकांची नियुक्ती करते. मात्र, ही नेमकी भरारी पथके आहेत की वसुली पथके हेच कळत नाही. कारण भरारी पथके नेमून ही काळाबाजार सुरूच असल्याचे लक्षात येत आहे. याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. कृषी विभागाने लवकरात लवकर लिंकिंग करणाऱ्यांवर आळा घालावा नाही तर शेतकरी संघटना आक्रमक पावले उचलणार असल्याचे संदीप पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
-संदीप आधार पाटील,
शेतकरी संघटना माजी जिल्हाध्यक्ष जळगाव