जळगाव : यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील रिक्षाचालक व प्रवासी असोसिएशनच्या अध्यक्षपदी सीताराम कोळी यांची निवड करण्यात आली आहे. या असोसिएशनला जळगाव सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे नुकतेच नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
विद्युत खांबावर वीज मीटर बसविण्याला विरोध
जळगाव : शिवाजीनगरातील रहिवाशांनी विद्युत खांब्यावर वीज मीटर बसविल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन, सर्व मीटर जळण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच भविष्यात घराबाहेरील वीज मीटरमुळे मीटरला कुठलीही हानी होण्याची शक्यता असल्याने, महावितरणे हे मीटर सुरक्षित राहणार असल्याबाबत लेखी हमी द्यावी, अन्यथा पूर्वीप्रमाणे घरात वीजमीटर बसवावे, अशी मागणी शिवाजी नगरातील रहिवासी विजय राठोड, विशाल वाघ, प्रवीण पगारे, लक्ष्मण शेळके यांनी मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आदर्श विद्यालयाचा वर्धापन दिवस उत्साहात
जळगाव : कानळदा येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा ७२ वा वर्धापन दिवस कानळदा येथे उत्साहात पार पडला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य के. पी. चव्हाण, पर्यवेक्षक के. एम. विसावे यांच्यासह इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांसाठी स्मार्ट कार्ड नोंदणीच्या सूचना
जळगाव : राज्य परिवहन महामंडळाने दिव्यांग बांधवांसाठी स्मार्ट कार्ड नोंदणी मोहीम राबविण्याच्या सूचना संबंधित विभागांना केल्या आहेत. तर नोंदणीसाठी संबंधित लाभार्थांकडे आधारकार्ड किंवा मतदान कार्ड आदी ओळखपत्र असणे गरजेचे आहे. नोंदणीसाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. इतर प्रवाशांप्रमाणे आता दिव्यांग बांधवांनाही महामंडळाच्या प्रवास सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड काढणे, बंधनकारक करण्यात येणार आहे.
बस स्थानकासमोर वाहतूक कोंडी
जळगाव : नवीन बस स्थानकासमोर विविध खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या राहत असल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. शनिवारी सायंकाळी या ठिकाणी वाहतूक कोंडी उद्भवली. यामुळे पादचारी नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागत होती. तरी मनपाने या विक्रेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी
जळगाव : शहरातील अनेक भागातील सिंग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे, वाहनधारक सुसाट वाहने चालवित आहेत. यामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी वाहतूक विभागाने सिग्नल यंत्रणा बंद असल्यावर, शहरातील प्रत्येक चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
आझाद हिंद एक्सप्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी
जळगाव : पुण्याला जाण्यासाठी सध्या महाराष्ट्र एक्सप्रेसनंतर आझाद हिंद एक्सप्रेस ही गाडी सुरू आहे. मात्र, या गाडीला प्रचंड गर्दी राहत असल्यामुळे, इतर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या गाडीला जादा डबे जोडण्याची मागणी होत आहे.
रूळ ओलांडणाऱ्यांवर कारवाईची मागणी
जळगाव : रेल्वे रूळ ओलांडणे कायद्याने गुन्हा असला तरी, अनेक प्रवासी गाडीतून उतरल्यानंतर रूळ ओलांडून स्टेशनबाहेर पडत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तरी रेल्वे सुरक्षा बलाने या बेजबाबदार प्रवाशांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
बेकायदा खाद्य पदार्थ विक्रेत्यांमुळे आरोग्याला धोका
जळगाव : रेल्वे स्टेशनवर परवानाधारक खाद्य पदार्थ व्यावसायिक असतानाही, रेल्वे गाडीत मात्र, बाहेरील व्यावसायिक बेकायदेशीरपणे खाद्य पदार्थ विक्री करत आहे. विशेष म्हणजे उघड्यावरच हे पदार्थ विक्री करत असल्याने, प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
महामार्गावरील व्यावसायिकांमुळे अपघाताची शक्यता
जळगाव : सध्या शहरातून गेलेल्या महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, यामुळे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. असे असतांना शासकीय आयटीआयजवळ महामार्गाला लागून, सायंकाळी खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्यांमुळे या कोंडीत अधिकच भर पडत आहे. परिणामी यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, मनपाने या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.