राज्यस्तरीय चिंतन शिबिर एक सत्राध्यक्षपदी विलास पाटील यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 04:17 PM2019-12-18T16:17:44+5:302019-12-18T16:18:00+5:30
तांदळवाडी, ता.चोपडा येथील मुख्याध्यापक विलास पाटील यांची आळंदी येथे होणाऱ्या चिंतन शिबिरात 'पाठ्यपुस्तकातील कवितांचे सादरीकरण' या सत्राच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
चोपडा, जि.जळगाव : जयश्री दादाजी हायस्कूल, तांदळवाडी, ता.चोपडा येथील मुख्याध्यापक व तालुक्यातील मराठीचे ज्येष्ठ शिक्षक विलास पाटील (खेडीभोकरी) यांची पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघ आयोजित आळंदी येथे २२ ते २४ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ३ दिवसीय मराठी भाषा राज्यस्तरीय चिंतन शिबिरात 'पाठ्यपुस्तकातील कवितांचे सादरीकरण' या सत्राच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मराठीचे अभ्यासू शिक्षक म्हणून परिचित विलास पाटील यांनी या आधी बालभारती इयत्ता आठवी मराठी पाठ्यपुस्तक समिक्षण समिती, इयत्ता नववी मराठी विषय शिक्षक हस्तपुस्तिका निर्मिती समिती सदस्य, वेळोवेळी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले आहे. नगर झालेल्या महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाच्या राज्याच्या ३ दिवसीय कृतिसत्राचेही अध्यक्षपद भूषविले आहे. पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघाने खान्देशातल्या मराठी शिक्षकाला एका सत्राचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाल्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.