दादावाडी परिसर : अनेकवेळा तक्रारी करुनही खड्ड्याची दुरूस्ती न करणाऱ्या लोक प्रतिनिधींचा अनोखा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील महामार्गालगत असलेल्या दादावाडी परिसरातील पाईपलाईनच्या खड्ड्याची दोन महिन्यांपासून नगरसेवकांना सांगूनही दुरुस्ती करण्यात येत नसल्याने नागरिकांतर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी संतप्त रहिवाशांनी या खड्ड्याला थेट आमदार, खासदार व नगरसेवकांचे नाव देऊन सेल्फी पॉईंट बनवला आहे. यामुळे निष्क्रीय लोकप्रतिनिधींचा अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील दादावाडी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून मनपा प्रशासनाने फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करून खड्डा मात्र जैसे थे ठेवला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना या खड्ड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील रहिवाशांनी या खड्डयाच्या दुरुस्तीसाठी प्रभागातील नगरसेवकांकडे अनेकवेळा तक्रारी केल्या, निवेदने दिली. मात्र, अद्यापही हा खड्डा बुजविण्यात आलेला नाही. या खड्ड्यात आतापर्यंत १५ ते २० गाड्या रुतल्या असून, ३० ते ४० नागरिक रात्रीच्या वेळेस या खड्ड्यात पडल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
नागरिकांनी बनवला सेल्फी पॉईंट
दिवसेंदिवस हा खड्डा नागरिकांसाठी जीवघेणा ठरत असल्याने अखेर शुक्रवारी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी ॲड. कुणाल पवार यांनी या खड्ड्याला आमदार, खासदार, नगरसेवक यांची नावे देऊन सेल्फी पॉईंट सुरू केला आहे.
पहिल्या दिवशी याठिकाणी कुंदन सूर्यवंशी, राहुल पाटील, सचिन नन्नवरे, नितीन जाधव, सागर पाटील, पवन पवार यांनी सेल्फी काढून लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवला.
इन्फो :
उत्कृष्ट फोटो काढणाऱ्याला बक्षीस देणार
या परिसरातील रहिवासी कुंदन सूर्यवंशी यांनी या खड्ड्यासोबत नागरिकांना फोटो काढण्याचे आवाहन केले आहे. जे नागरिक उत्कृष्ट फोटो काढतील, त्यांना बक्षीस देणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. दरम्यान, लोकप्रतिनिधींच्या नावे सुरू केलेल्या या सेल्फी पॉईंटची सर्वत्र चर्चा सुरू आहे.