अंजलीच्या पाठीशी शमिभा उभी राहिली अन् इतिहास घडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:07 AM2021-01-24T04:07:46+5:302021-01-24T04:07:46+5:30
मराठीमध्ये एम.ए. केलेल्या शमिभा या वंचित बहुजन आघाडीच्या युवक जिल्हाध्यक्ष आहेत. अंजलीचा अर्ज नाकारला गेला. त्यावेळी शमिभा फैजपूरला होत्या. ...
मराठीमध्ये एम.ए. केलेल्या शमिभा या वंचित बहुजन आघाडीच्या युवक जिल्हाध्यक्ष आहेत. अंजलीचा अर्ज नाकारला गेला. त्यावेळी शमिभा फैजपूरला होत्या. अंजलीने अर्ज नाकारल्याची माहिती त्यांना दिली. अर्ज अखेरच्या काही तासात नाकारला होता. मात्र शमिभा तातडीने जळगावला परत आल्या. त्यांनी संपूर्ण माहिती घेतली. निवडणूक निर्णय अधिकारी वाल्हे आणि तहसीलदार नामदेव पाटील यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र कायद्याची जाण आणि लैंगिक समानतेसाठी लढा उभारणाऱ्या शमिभा यांनी कुणालाही जुमानले नाही. त्यांनी थेट औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यांनी या याचिकेत मांडलेल्या मुद्यांना खंडपीठानेही मान्य केले आणि निवडणुकीत उभे राहण्याचा अंजलीचा मार्ग मोकळा झाला. मार्ग मोकळा झालेला असला तरी निवडून येण्याची कसरत अंजलीला करायची होती. इथून पुढचा प्रवास होता. तो आतापर्यंत जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये फक्त स्त्री की पुरुष अशीच चर्चा होत होती. मात्र अंजलीच्या यशाने खरी चर्चा सुरू झाली आहे स्त्री, पुरुष आणि तृतीयपंथी यांची.
याबाबत बोलताना शमिभा पाटील यांनी सांगितले की,‘आमच्या समानता आणि स्वाभिमानाचा हा फक्त पहिला टप्पा होता. ही सुरुवात आहे. आम्ही खंडपीठात मुद्देसूद याचिका दाखल केली होती. नालसा जजमेंट, तिसरा महिला आयोग यांनी तृतीयपंथीयांना दिलेल्या सुविधा यांचा उल्लेखही त्यात करण्यात आला होता. त्यामुळे आम्ही न्यायालयातून आमचा हक्क मिळवून दिला. अंजलीचा निवडणुकीचा संघर्ष सुरू झाला. ही संधी आहे हे आमच्या लक्षात आले होते. अंजली या आधीच्या निवडणुकीत फक्त ११ मतांनी पराभूत झाली होती. हा फरक यावेळी पुसून काढण्यासाठी आम्ही मेहनत घेतली. अंजलीने गावकऱ्यांचा विश्वास जिंकला. पुढचा टप्पा हा तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध नोकरभरतींमध्ये आरक्षण मिळवून देण्यावर आहे. जर निवडणुकीसाठी महिला राखीव वॉर्डातून उभे राहता येते. तर महिला राखीव असलेल्या आरक्षणातून देखील नोकरी मिळवता येऊ शकते हे आम्ही सर्वांच्या निदर्शनास आणून देणार आहोत. अंजलीने सर्वांसमोर एक आदर्श उभा केला आहे. पुढच्या काळात तिची प्रेरणा घेऊन जळगाव जिल्ह्यातून किमान चार ते पाच तृतीयपंथी हे पोलीस भरती, दोन जण रेल्वे भरतीसाठी प्रयत्न करत आहेत. तर चार जण हे वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांमध्ये कार्यरत आहे. स्वत: अंजली यांनी देखील विविध संस्थांवर काम केले आहे.
निवडणूक जिंकणाऱ्या अंजली या फक्त आठवी पास आहेत. मात्र त्यांनी दाखवलेले धैर्य मात्र अफाट आहे. या पुढच्या वाटचालीबद्दल बोलताना अंजली यांनी सांगितले की, गावाचा विकासाकडे लक्ष देणार आहे. गावातील गटातटाच्या राजकारणात न पडता विकास हेच एकमेव ध्येय असेल. महिलांसाठी शौचालयांचा मुद्दा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. ही निवडणूक जिंकले हा एक भाग झाला. पण माझ्यासारखीच अनेक स्वप्ने असणाऱ्या तृतीयपंथीयांचा लढा हा खूप मोठा आहे. मला माझ्या लढाईतून त्यांच्यासाठी काम करायचे आहे. ’
जळगाव जिल्ह्यात ३०० पेक्षा जास्त तृतीयपंथीय आहेत.