लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता झालेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. तालुक्यातील कन्हेरे येथील एक तरुण व शिरूड येथील एक शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत, तर भोई वाड्यातील दोन जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. शिक्षक बाधित आल्याने शिरूडची शाळा सोमवारपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना असून शिक्षकाच्या संपर्कातील विद्यार्थी व शिक्षकांची आरटीपीसीआर व अँटिजन चाचणी घेण्यात आली.
शिरूड येथे कोरोना चाचणीचा कॅम्प घेण्यात आला होता. त्यात अमळनेरचे रहिवासी असलेले शिक्षक दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. मात्र आधी पॉझिटिव्ह आल्याने या शिक्षकाचे लसीकरण झालेले नाही.
पथक पोहोचले शाळेत
शिरूड येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक पॉझिटिव्ह येताच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांच्या आदेशाने जानवे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर अतुल चौधरी यांनी आपल्या पथकासह शाळेतील ३५ विद्यार्थी आणि १२ शिक्षक व कर्मचारी यांची अँटिजन व आरटीपीसीआर अशा चाचण्या करून घेतल्या. त्यात सर्वांची अँटिजन निगेटिव्ह आली आहे, तर आरटीपीसीआर अहवाल प्रलंबित आहे. मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे यांनी तातडीने शाळा सॅनिटाईज करून घेतली आहे. विद्यार्थ्यांना घरीच सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत व पॉझिटिव्ह आलेला शिक्षक घरीच क्वारंटाईन आहे.
१०२ जणांची चाचणी
संबंधित शिक्षक राहत असलेल्या धुळे रोड परिसरातील शिक्षकांच्या हाय रिस्क संपर्कातील १०२ जणांची अँटिजन निगेटिव्ह आली आहे. २१ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली, तो अहवाल प्रलंबित आहे.
त्याचप्रमाणे तालुक्यातील कन्हेरे येथे एक तरुण पॉझिटिव्ह आला आहे. हा तरुण नाशिक येथे कामाला होता. त्याची तब्येत बरी नसल्याने तो गावी आला होता. त्याला लक्षणे दिसत असल्याने त्याची चाचणी केल्यावर तो पॉझिटिव्ह आला होता. त्यालाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.
----
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सोमवारपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आली आहे. आरटीपीसीआर अहवाल आल्यानंतर पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल
- जयवंतराव पाटील, शाळा समिती, शिरूड.
----
डेंग्यूबाधित आढळल्याने खळबळ
त्याचप्रमाणे शहरातील बालाजीपुरापाठोपाठ आता भोईवड्यातही दोन डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. तसेच पारोळा तालुक्यातील सुमठाणे येथील एकाने अमळनेर येथे तपासणी केल्याने तो देखील डेंग्यू पॉझिटिव्ह आला आहे. नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन यांनी तीन पथकांच्या माध्यमातून १३८ घरांचा सर्व्हे केला असता, ३२ कंटेनर दूषित आढळले. सर्व कंटेनर रिकामे करण्यात आले आहेत. तेथे तातडीने औषध फवारणी करण्यात आली आहे. बालाजीपुरा भागात अनेक जणांच्या घराबाहेरील टाक्यांमध्ये पाणी साठवले असल्याने त्यात डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या. तसेच काही निरुपयोगी पाण्याचे साठे, डबकी, टाक्या दूषित आढळल्या. त्यात ऑईल, डिझेल टाकण्यात आले आहे.