‘सहकार’ चा गड सर करण्यासाठी शिवसेना सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:28+5:302021-07-21T04:12:28+5:30
अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल केव्हाही वाजू ...
अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल केव्हाही वाजू शकतो. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर एकेकाळी राष्ट्रवादी व काँग्रेसचा दबदबा होता. मात्र, २०१५ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपचा दबदबा वाढला होता. त्या तुलनेत सेनेची ताकद सहकारी संस्थांमध्ये कमीच आहे. ही ताकद वाढविण्यासाठी सेनेकडून शिवसंपर्क अभियानाव्दारे मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, ‘सहकार’ चा गड सर करण्यासाठी सेनेने हालचाली सुरु केल्या आहेत.
आगामी काळात रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल केव्हाही वाजण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील १,१०० पेक्षा अधिक सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असल्या तरी यामध्ये जिल्हा बँक, ग.स.सोसायटी, दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समित्या, मराठा विद्या प्रसारक मंडळ या महत्त्वाच्या संस्थांचा समावेश आहे. त्यात जिल्हा बँक व दूध संघात राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना मोठा रस असल्याने या दोन्हीही संस्था काबीज करण्यासाठी शिवसेनेने आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे.
पदाधिकारी जोडण्यासह संपर्कावर दिला जातोय भर
शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियान सुरु केले असून, या अभियानाद्वारे थेट तालुका, गाव पातळीवर जाऊन मेळावे घेतले जात आहे. तसेच अनेक महिन्यांपासून रखडलेल्या नियुक्त्या देखील जाहीर केल्या जात आहे. महिनाभरापूर्वीच शिवसेनेने जिल्ह्यात चार जिल्हा प्रमुखांची तर दोन सह संपर्क प्रमुखांची नियुक्ती केली होती. त्याचा फायदा आता या अभियानात होताना दिसून येत आहे. कारण प्रत्येक विधानसभा निहाय मेळावे हे जिल्हा प्रमुखांना विभागून देण्यात आल्याने दररोज तीन ते चार मेळावे घेऊन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संपर्क जोडून नवीन कार्यकर्ते जोडण्याचे काम सेनेने सुरु केले आहे.
भाजपसह राष्ट्रवादीही आपल्याच अडचणीत गुंतलेली
१. जिल्ह्यात शिवसेनेने गेल्या चार वर्षात आपली ताकद वाढविली आहे. जिल्ह्यात सेनेचे पाच आमदार असून, महापालिका तसेच चार नगरपालिका देखील सेनेच्या ताब्यात आहेत. अशा परिस्थितीत सहकारी संस्थांमध्ये कमी असलेली ताकद वाढविण्यासाठी सेनेकडून मोर्चेबांधणी सुरु असताना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याच अडचणींमध्ये गुरफटलेली दिसून येत आहे.
२. सहकारी संस्थांमध्ये भाजपला महत्त्वाचे स्थान मिळवून देणारे एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेले आहेत. तसेच जिल्ह्यात भाजपचे जिल्हा नेते व माजी मंत्री गिरीश महाजन मनपातील सत्तांतरानंतर दिल्ली, मुंबईच्याच वारीमध्येच गुंतले आहेत. जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे देखील अजिंठा विश्रामगृह सोडून जिल्ह्यात फिरायला तयार नाहीत. तर दोन्हीही खासदार दिल्लीच्या वारीसह काही आंदोलनापुरतेच जिल्ह्यात दिसून येत आहेत.
३. दुसरीकडे एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्याने पक्षाची ताकद वाढेल अशी आशा असताना, ईडीच्या फेऱ्यामुळे खडसे अजूनही पक्षाला वेळ देऊ शकलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस देखील गटबाजीत विभागली गेली आहे. शहर व जिल्हा राष्ट्रवादी विखुरली गेली आहे. तर अरुणभाई गुजराथी, ईश्वरलाल जैन, एकनाथ खडसे, डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर यांच्यासारख्या दिग्गजांची फळी असूनही पक्ष अंतर्गत गटबाजीने पोखरला जात आहे.
सावंत, पारकरांची शिष्टाई अन् नेते येऊ लागले जवळ
काही दिवसांपूर्वी शिवसेनेत देखील गटबाजी वाढली होती. मात्र, गेल्या आठवड्यात सेनेचे दोन्हीही लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख संजय सावंत व विलास पारकर यांनी जिल्ह्यातील सेनेच्या नेत्यांशी वैयक्तिक चर्चा करून, ही गटबाजी शमविण्यास काही प्रमाणात यश मिळविलेले दिसून येत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील हे देखील जवळ येत असून, त्याचा प्रत्यय मजीप्राच्या कार्यक्रमात देखील दिसून आला. सावंत व पारकरांनी केलेली शिष्टाई व एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात पक्ष प्रमुखांच्या सूचनेनंतर सेना एका वेगळ्या उत्साहात आगामी सहकारी संस्था व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सज्ज होताना दिसून येत आहे.