शिवाजीनगरवासियांना आता पुलासाठी ‘टी’ आकारासाठी उपरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:17 AM2021-02-11T04:17:28+5:302021-02-11T04:17:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम आराखड्यानुसार ‘टी’ आकारात मंजूर असताना, प्रत्यक्षात मात्र हे काम ‘एल’ आकाराप्रमाणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम आराखड्यानुसार ‘टी’ आकारात मंजूर असताना, प्रत्यक्षात मात्र हे काम ‘एल’ आकाराप्रमाणे होत असल्याने आता शिवाजीनगर भागातील नागरिकांनी या ‘एल’ आकाराच्या पुलाला विरोध केला आहे. तसेच आराखड्यात मंजुरी असलेल्या ‘टी’ आकाराच्या पुलाप्रमाणेच या पुलाचे बांधकाम करण्यात यावे अन्यथा पुन्हा आंदोलनाचा इशारा या भागातील नागरिकांनी व नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी दिला आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक देखील या भागातील नागरिकांनी काढले आहे. एल आकाराचा पूल झाल्यास त्याचा फायदा शिवाजीनगरवासियांना होणार नसल्याचेही म्हटले आहे.
शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याआधीच या पुलाच्या विविध पर्यायांवरून या पुलाचे काम वादात सापडले होते. शिवानगरवासियांनी या पुलाचे काम ‘वाय’ आकारात करण्यात यावे, अशी मागणी केली होती. तसेच ‘टी’ आकाराच्या पुलाला विरोध केला होता. मात्र, शिवाजीनगर भागातील नागरिकांचा विरोध झुगारून ‘टी’ आकारातच करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पुलाचे काम सुरू झाल्यानंतर शिवाजीनगरवासियांनीही ‘टी’ आकाराच्या पुलाला मंजुरी देत, आपला विरोध कमी केला होता. मात्र, पुलाचे काम सुरू झाल्यानंतर वर्षभरानंतर जेव्हा पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले तेव्हाच सार्वजनिक बांधकाम विभागाने परस्पर निर्णय घेत हा पूल ‘टी’ आकारात न करता अगोदरप्रमाणेच ‘एल’ आकारात पूल करण्याचा निर्णय घेतल्याने आता पुन्हा नवीन वाद निर्माण झाला आहे.
शिवाजीनगरवासियांचे घूमजाव
शिवाजीनगरवासियांनी पुलाचे काम सुरू होण्याआधी ‘वाय’ व ‘एल’ आकाराची मागणी केली. तर ‘टी’ आकाराला विरोध केला. आता मात्र, नवीन पत्रक काढून ‘टी’ आकाराच्या पुलाची मागणी केली आहे. तर ‘एल’ आकाराला विरोध केला आहे. या भागातील नागरिकांच्या घूमजावमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
बांधकाम विभागाचेही चुकीचे धोरण
शिवाजीनगरवासियांकडून जेव्हा ‘एल’ आकाराची मागणी केली जात होती. तेव्हा विरोध झुगारून ‘टी’ आकाराचा आराखडा मंजूर करून घेतला. तसेच या पुलाचे काम ‘टी’ आकारातच करण्यास सुरुवात केली. जेव्हा सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. कामाला सुरुवात झाली होती, नागरिकांचा विरोध मावळला होता. तेव्हाच सार्वजनिक बांधकाम विभागाला हा पूल ‘एल’ आकारातच करण्याचा शहाणपणा का सुचला? आधी जेव्हा विरोध होत होता तेव्हा का निर्णय घेतला नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच ‘टी’ आकाराबाबत शिवाजीनगरवासियांची मानसिकता तयार झाली असतानाच, परस्पर आराखड्यात बदल का ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
या अडचणींमुळे शिवाजीनगर भागातील नागरिकांचा विरोध
१. जेव्हा ‘टी’आकाराला विरोध केला जात होता. तेव्हा शिवाजीनगर भागातील नागरिकांनी परिसरातील इमारतींना धोका निर्माण होईल, तसेच शिवाजीनगर भागात अपघातांचे प्रमाण वाढेल, अशी कारणे दिली होती. एल किंवा वाय आकाराचा पूल तयार केल्यास वाहतुकीचा प्रश्न ही सुटेल व शिवाजीनगर भागातील नागरिकांना अडचणी येणार नाही, असे सांगितले.
२. आता मात्र, रेल्वेने तहसील कार्यालयाकडून पायी जाण्याचा रस्ता येत्या काही महिन्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ‘एल’ आकाराचा पूल झाल्यास नागरिकांना शहरात येण्यासाठी हा पूल एकच पर्याय राहणार आहे. तसेच हा फेरादेखील मोठा पडणार असल्याने अमर चौक भागात ‘टी’ आकाराचा पूल आल्यास हा फेरा कमी होणार आहे. त्यामुळे नागरिकांना दोन्हीही बाजूंनी शहरात जाणे सोपे ठरणार आहे. या अडचणीमुळे आता शिवाजीनगर भागातील नागरिकांनी ‘टी’ आकाराच्याच पुलाची मागणी केली आहे. याबाबत भाजपचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनीही प्रसिद्धीपत्रक काढले आहे.