जळगाव :जळगाव शहर मतदारसंघात अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या घरावर गोळीबाराची घटना मेहरुण परिसरात १८ नोव्हेंबर रोजी पहाटे घडली होती. या गुन्ह्याच्या तपासात या उमेदवारानेच मुलगा, शालक व त्याच्या मित्राच्या मदतीने सहानुभूती मिळविण्यासाठी स्वतःच्या घरावर गोळीबार केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. यात उमेदवारासह तिघांना अटक करण्यात आली असून दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून मेहरुण परिसरातील शेरा चौकात राहणारे निवृत्त शिक्षक अहमद हुसेन शेख (वय ५०) यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. निवडणुकी दरम्यान १८ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता शेख कुटुंबीय साखर झोपेत असतानाच दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी घरावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. उमेदवार शेख अहमद शेख हुसेन याचा शालक इरफान अहमद (वय ३२, रा. मालेगाव) हा त्याचा मित्र मोहम्मद शफिक उर्फ बाबा (रा. मालेगाव) याच्यासोबत १७ नोव्हेंबर रोजी रात्री मालेगावहून जळगावला आले. त्यानंतर पहाटे ४ वाजेच्या सुमारास मोहम्मद शफिक उर्फ बाबाने इरफान अहमदसोबत येऊन घरावर गोळीबार केल्याचे या तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी इरफान मोहम्मद याला मालेगावमधून ताब्यात घेतले. तर त्याच्यासह उमेदवार असलेल्या अहमद शेख यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उमेदवाराचा मोठा मुलगा शिबान हुसेन (वय २३, रा. शेरा चौक, मेहरुण) यालादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मोहम्मद शफिक उर्फ बाबा व उमर शेख फारुख हे दोन्ही संशयित फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.