जिल्हा काँग्रेसमध्ये पंधरा दिवसात खांदेपालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:22 AM2021-06-16T04:22:11+5:302021-06-16T04:22:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा काँग्रेसमध्ये येत्या पंधरा दिवसात जिल्हाध्यक्ष बदलासह मोठे संघटनात्मक बदल होणार आहेत. सध्या जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा काँग्रेसमध्ये येत्या पंधरा दिवसात जिल्हाध्यक्ष बदलासह मोठे संघटनात्मक बदल होणार आहेत. सध्या जिल्हा कॉंग्रेसबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पक्षश्रेष्ठींनी जिल्ह्यातील मोजक्या पदाधिकाऱ्यांकडून पाच तास जिल्हा काँग्रेसचा सोमवारी मुंबईतील गांधीभवन येथे आढावा घेतला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मंत्री यशोमती ठाकूर, उत्तर महाराष्ट्र प्रभारी आमदार प्रणिती शिंदे, कार्याध्याक्ष आमदार कुणाल पाटील आदी उपस्थित होते. आमदार शिरीष चौधरी हे पक्षश्रेष्ठींसह व्यासपीठावर बसले होते. दुपारी चार ते रात्री ९ वाजेपर्यंत हा आढावा चालला. पक्षासंदर्भातील निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे आता आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे देण्यात यावे, सर्वानुमते निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या पंधरा दिवसात काँग्रेसमध्ये सर्व संघटनात्मक बदल करण्यात येतील, असेही यावेळी जाहीर करण्यात आले.
जिल्ह्यातून यांची होती उपस्थिती
जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, उत्तर महाराष्ट्र समन्वयक योगेंद्रसिंग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भालेराव, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, राजीव पाटील, प्रदीप पवार आदी पदाधिकारी या बैठकीला होते. नाना पटोले यांनी सर्वांची मते जाणून घेतली.
जिल्हाध्यक्ष पदासाठी ही नावे चर्चेत
माजी प्रदेश सचिव डी. जी. पाटील, विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भालेराव, माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, भगतसिंग पाटील, एरंडोलचे तालुकाध्यक्ष विजय महाजन यांची नावे आता जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत पुढे येत आहेत.
नाना पटोले लवकर दौऱ्यावर
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आगामी आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात काँग्रेसमध्ये अनेकांचा प्रवेश होणार आहे. दोन दिवसांचा हा दौरा राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.