प्रसाद धर्माधिकारी
नशिराबाद : व्रतांचा राजा असलेला श्रावण मास भगवान शिवशंकराच्या उपासनेचा पर्वकाल असतो. मंगलमय व्रतवैकल्यांच्या श्रावण महिन्याच्या पर्वास ९ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. यंदा २९ दिवसांचा श्रावण मास आहे. यंदा श्रावण मासास श्रावणी सोमवाराने सुरुवात होत असून पाच श्रावणी सोमवार आहेत.
इन्फो
पहिला सोमवार ९ ऑगस्ट शिवमूठ तांदूळ
दुसरा सोमवार १६ ऑगस्ट शिवमूठ तीळ
तिसरा सोमवार २३ ऑगस्ट शिवमूठ मूग
चौथा सोमवार ३० ऑगस्ट शिवमूठ जवस
पाचवा सोमवार ६ सप्टेंबर शिवमूठ सातू
२० ऑगस्टला प्रदोष, ४ सप्टेंबरला शनिप्रदोष
नागपंचमी
श्रावण मासातील शुक्ल पंचमीस नागपंचमी असे संबोधतात. या दिवशी नागदेवतेच्या पूजनाचे अनन्य महत्त्व आहे. काही जण रांगोळी, चंदनाने पाटावर नाग काढून पूजन करतात किंवा प्रतिमा वा मंदिरात जाऊन पूजनाची प्रथा आहे. पंचोपचार पूजन करून लाह्या, फुटाणे, हरभरा, दूध, अर्पण केले जाते. या दिवशी जमीन खणणे, पोळ्या भाजणे, भाजी कापणे आदी सर्व काम बंद ठेवतात. चुलीवर तवा ठेवत नाहीत. जेथे वारूळ असेल तेथे पूजन करतात.
शीतला सप्तमी
श्रावण मासातील शुक्ल सप्तमीला शीतला सप्तमी व्रत केले जाते. त्या दिवशी चुलीची(गॅस) पूजाअर्चा करून त्यावर आंब्याचे रोप ठेवले जाते. जलदेवतेचे पूजन करून त्यात दहीभात, गूळ पापडी आदी पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. शीतला सप्तमीच्या पूर्वसंध्येला अन्न शिजवून ठेवले जाते.
कानबाई उत्सव
खान्देशवासीयांचे कुलदैवत असलेला कानबाई उत्सव अर्थात रोट हा उत्सव नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. कुलाचाराप्रमाणे सकाळी आदित्य (सूर्यनारायण) व सायंकाळी कानबाई रोट उत्सव होत असतो. दुसऱ्या दिवशी परंपरेनुसार विसर्जन केले जाते.
रक्षाबंधन
बहीण-भावाच्या स्नेहबंधनाचा दिवस. या दिवशी बहीण भावाचे औक्षण करीत राखी बांधते व भाऊराया तिच्या संरक्षणाचे वचन देत असतो.
श्रावणी
श्रावण मासात विशिष्ट दिवशी श्रावणी अर्थात यज्ञोपवीत विधिवत धारण करण्याचा विधी आहे. पंचगव्य ग्रहण करून दशविधी स्नान करीत श्रावणी विधी करण्यात येतो. या विधीस अनन्य महत्त्व आहे.
गोकुळाष्टमी
भगवान विष्णूने धर्माचे रक्षण करण्यासाठी श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण अवतार घेतला. तो दिवस गोकुळाष्टमी आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सव रात्री बारा वाजता साजरा केला जातो. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध केला व आई-वडिलांना बंदिवासातून मुक्त केले. गोकुळ अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी उपवासाचे पारणे केले जाते.
गोपाळकाला
श्रावणामध्ये नवमीला दहिकाला अर्थात गोपालकाला म्हटले जाते. दहीहंडी टांगून मानवी मनोरे रचत श्रीकृष्णस्वरूप गोविंदाकडून दहीहंडी फोडण्यात येते. त्या दहीहंडीत दही, ताक, पोहे भरले जातात.
पोळा
श्रावण मासाची सांगता अमावस्येला होते. या दिवशी वृषभ पूजनाला अनन्य महत्त्व आहे. वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या बैलांना सजवून पुरणपोळीचा नैवेद्य देऊन वाद्यांच्या तालावर मिरवणूक काढण्यात येते. घरात मातीच्या बैलांचे पूजन करून त्यांच्या खांद्यावर काकडी ठेवण्यात येते. या दिवशी मातृदिन असतो. श्रावणमासातील विविध व्रतांची सांगता अमावस्येला होते.
श्रावण व व्रतांचा महिमा
सोमवारी शिवशंकर पूजन उपवास, मंगळवारी मंगळागौरीचे उत्सव, बुधवार-गुरुवारी बुध बृहस्पती व्रत, शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन, शनिवारी नरसिंह-पिंपळ, शनि- मारुती पूजन, रविवारी गभस्ती सूर्याचे मौनाने पूजन. श्रावण मासात प्रत्येक वारास व्रतवैकल्यांना महत्त्व आहे.
उत्सव मंगळागौरीचा
श्रावण मासातील प्रत्येक मंगळवाराला मंगळागौरीचा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. मुलीचे लग्न झाल्यावर पाच वर्षांपर्यंत तिच्याकडून मंगळागौरीचे पूजन केले जाते. प्रथम वर्षी माहेरी व पुढे सासरी पूजन करण्यात येते. त्यात शेवंती, धोत्रा, दुर्वा आदी सोळा प्रकारच्या पत्री फुलांनी पूजन केले जाते. मंगळागौरीची षोडशोपचार पूजन करून सुवासिनी सौभाग्य वाण देतात. रात्री जागरण करण्याची प्रथा आहे. श्रावणात मंगळवारी हे व्रत केले जाते.
जरा जिवंतिका
दर शुक्रवारी जरा जिवंतिकाची पूजन आरती करण्यात येते. त्या दिवशी जिवतीना दिव्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो.