लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : मलशुद्धीकरण केंद्राच्या कामावरून शनिवारी पडलेल्या ठिणगीची आग सोमवारी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत जाऊन पोहोचली. दुपारी १२ वाजता उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण यांच्यासह शविआचे उपनेते सुरेश स्वार व सदस्यांनी आक्रमक होत 'आम्ही कोणती विकासकामे बंद पाडली' असा जाब विचारत मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्यासह नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनाही घेराव घातला. प्रोसेडिंग बुकाची मागणी करीत त्याची तपासणीही केली.
शविआचे सदस्य रामचंद्र जाधव, दीपक पाटील, शेखर देशमुख, सूर्यकांत ठाकूर, अलका सदाशिव गवळी, सविता सत्यवान राजपूत, मनीषा देशमुख, योगिनी ब्राह्मणकर, जगदीश चौधरी यांच्यासह आरोग्य सभापती सायली जाधव यांचे पती रोशन जाधव यांनी दुपारी १२ वाजता मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या दालनात येऊन त्यांना घेराव घातला.
सत्ताधारी गटाचे नगरसेवक व भाजपचे शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले की, मलशुद्धीकरण केंद्राचे काम शविआचे सदस्यांनी थांबविले. यावर शविआच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. काम बंद पाडणे, विकासकामांना विरोध करणे. या आरोपांचे स्पष्टीकरण देण्याची मागणीही केली. सदस्यांना स्पष्टीकरण देताना नगराध्यक्षांची भंबेरी उडाली.
कोट्यवधी रुपयांच्या योजनेच्या कामांची सुरुवात गुपचूप कशी ?
शहरात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहे. ती गुपचूप का करण्यात येत आहे, असा सवालही शविआच्या सदस्यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना विचारला. यावर नगराध्यक्षांनी सांगितले की, काम केव्हा सुरू झाले, हे मलाच माहीत नाही. यामुळे चांगलाच गोंधळ झाला.
मलशुद्धीकरण केंद्राच्या खड्ड्याचे खोदकाम सुरू असताना भुयारी गटार योजनेचा गाजावाजा का केला जात आहे, असाही प्रश्न उपस्थित केला. नगरपालिकेचे कामकाज त्रयस्थ व्यक्ती चालवते का? अशा प्रश्नांची सरबत्ती केली.
प्रोसेडिंग बुकमध्ये 'त्या' विषयाची नोंदच नाही
उपनगराध्यक्षा आशाताई चव्हाण यांच्यासह शविआच्या सदस्यांनी यांनी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त पाहण्यासाठी प्रोसिडिंग बुकाची मागणी केली. यावेळी मुख्याधिकारी व नगरसेवकांमध्ये खूपच गोंधळ निर्माण झाला. शेवटी, सदस्यांचा आक्रमक पवित्रा पाहून मुख्याधिकारी नवाळे यांनी प्रोसिडिंग मागविले. सभेचे इतिवृत्त पाहण्यास ठेवले. त्यावेळी शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या निदर्शनास आले की, सर्वसाधारण सभेमधील एक ते ४७ विषयांपैकी प्रोसिडिंग बुकमध्ये आजपर्यंत मलनिःस्सारण योजनेचे विषय क्रमांक ४६ व ४७ चे इतिवृत्त प्रोसिडिंग बुकमध्ये नोंदविलेले नाही. याचाही त्यांनी जाब विचारला. प्रोसेडिंग बुक कोरे का ठेवण्यात आले, याचा लेखी खुलासा उपनगराध्यक्षांनी मागितला.
मलशुद्धीकरण केंद्राच्या या जागेवर जनतेच्या हरकती असताना यावर आपण प्रोसिडिंगमध्ये काय निर्णय दिला. याचा लेखी खुलासा द्यावा, अशी मागणी मुख्याधिका-यांकडे केली.