जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरूच असून दोन दिवसांपूर्वी तीन हजार रुपयांनी घसरण झालेल्या चांदीच्या भावात शुक्रवारी पुन्हा एक हजार रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे चांदी ६८ हजार ५०० रुपये प्रति किलोवर तर सोन्याच्याही भावात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार ९०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले.
कोरोनावर लस येणार तर कधी इंग्लंडमधील कोरोनाच्या नवीन विषाणूचा पुन्हा बाजारपेठेवर परिणाम होणार अशा शक्यतेने आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असलेल्या सोने-चांदीच्या भावावर त्याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. तसेच सट्टा बाजारातही सतत खरेदी-विक्री अचानक कमी जास्त प्रमाणात केली जात असल्यानेही सोने-चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार होत आहे.
यात २३ डिसेंबर रोजी तीन हजार रुपयांनी घसरण होऊन ६७ हजार ५०० रुपयांवर आलेल्या चांदीच्या भावात शुक्रवार, २५ डिसेंबर रोजी पुन्हा एक हजार रुपयांनी वाढ होऊन चांदी ६८ हजार ५०० रुपयांवर पोहोचली. अशाच प्रकारे २३ डिसेंबर रोजी ३०० रुपयांनी घसरण होऊन ५० हजार ७०० रुपयांवर आलेल्या सोन्याच्याही भावात शुक्रवारी (दि.२५) २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार ९०० रुपयांवर पोहोचले.
या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी (दि.२१) चांदीच्या भावात थेट दोन हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन चांदी ७१ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. त्यानंतर मंगळवारी (दि.२२) ५०० रुपयांनी, तर बुधवारी (दि.२३) थेट तीन हजार रुपयांनी घसरण होऊन चांदी ६७ हजार ५०० रुपयांवर आली होती.