लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : शासनाने शासकीय मका, ज्वारी, गहू धान्य खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीला दिनांक ५ एप्रिलपासून सुरुवात केली. पहिल्या दिवशी जवळपास १ हजार ७०० शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली. पण या ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी शेतकी संघाच्या कार्यालयापुढे सकाळी ५.३० वाजेपासून रांगा लावल्या होत्या. या नोंदणीच्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाला.
शासनाने हमीभाव देत शासकीय मका, ज्वारी, गहू खरेदी केंद्र सुरू करणार असल्याने शेतकऱ्यांनी यासाठी सातबारा पीकपेरा लावलेला उतारा घेऊन शेतकी संघाच्या कार्यालयात ऑनलाइन नावनोंदणी ५ एप्रिलपासून करावयाची होती. म्हणून शेतकऱ्यांनी या ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकी संघाच्या कार्यालयात सकाळी ५.३० वाजेपासून नंबर लावून रांगेत उभे होते. शेतकी संघापासून ते महामार्गपर्यंत लांबलचक रांग या ऑनलाइन नोंदणीसाठी झाली होती.
यावेळी शेतकी संघाच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मास्क लावा. सामाजिक अंतर पाळा, अशा सूचना केल्या. पण त्यांचे कोणीही ऐकत नव्हते. लांबचलांब रांगेत उभे राहत सामाजिक अंतराचा मात्र फज्जा यावेळी उडाला. महिनाभरही ऑनलाइन नांवे नोंदण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. नोंदणीसाठी आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची ऑनलाइन नोंदणी करून घेतली जाणार आहे. एकाही शेतकऱ्याला वाऱ्यावर बिननोंदणीचा सोडणार नाही, असे आश्वासन शेतकी संघाचे सचिव भरत पाटील यांनी दिले. यावेळी शेतकी संघाचे अध्यक्ष अरुण पाटील, भासभाऊ पाटील, प्रा. आर. बी. पाटील, शंतनू पाटील आदीजण उपस्थित होते.
शासकीय हमीभाव असे
मका : १८५० रुपये क्विं.
गहू : १९७५ रुपये क्विं.
ज्वारी : २६२०रुपये क्विं.
अशी राबविली प्रक्रिया
रांगेत आलेल्या शेतकऱ्यांकडून सातबारा उतारा घेऊन त्यावर नोंदणी क्रमांक टाकून तो क्रमांक त्या शेतकऱ्याला देण्यात आला. नंबरप्रमाणे हे सर्व उतारे मग ऑनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्याला जो नंबर आता नोंदणीवेळी देण्यात आला, तोच नंबर त्याचा ऑनलाइन नोंदणीचा राहणार आहे. यात एकाही ऑनलाइन नोंद मागे पुढे होणार नाही, असा विश्वास नोंदणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना सचिव भरत पाटील यांनी व्यक्त केला.