नाकारलेल्या शिक्षक भरती व पगाराच्या माहितीसाठी ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 10:32 PM2021-05-12T22:32:16+5:302021-05-12T22:32:34+5:30
माहिती मागितल्यावरही मिळाली नाही, म्हणून लोटन महारू चौधरी यांनी खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : शिक्षण उपसंचालकांनी कनिष्ठ महाविद्यालयातील भरतीचे प्रकरण नस्तिबद्ध केल्यानंतरही १८ कर्मचाऱ्यांचे पगार कसे काढण्यात आले? याची माहिती मागितल्यावरही मिळाली नाही, म्हणून लोटन महारू चौधरी यांनी खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. दुपारी प्राचार्यांनी माहिती देण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
२०१७ मध्ये खान्देश शिक्षण मंडळात बेकायदेशीररीत्या पदभार घेतलेल्या कार्याध्यक्षांनी बेकायदेशीररीत्या १८ कर्मचारी भरती केली. ही भरती स्थानिक वृत्तपत्रात गुपचूप जाहिरात देऊन करण्यात आली. याबाबत लोटन महारू चौधरी यांनी शासन व शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी केल्यानंतर शासनाने पदभरतीस बंदी असल्याने परवानगीचे प्रस्ताव नाकारून सर्व प्रकरणे नस्तिबद्ध केली होती. तरीदेखील कार्यकारी मंडळाने सुमारे दीड वर्षांपासून या बेकायदेशीर भरती केलेल्या शिक्षकांचा पगार नियमित काढणे सुरू केले आहे.
कोणत्या आधारावर पगार काढला, भरतीचा, कर्मचारी सूची प्रस्ताव मंजुरी, याबाबत लोटन चौधरी यांनी खा. शि. मंडळाचे प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्यांना माहिती अधिकारअंतर्गत माहिती मागितली होती. मात्र, ती देण्यास टाळाटाळ केल्याने लोटन चौधरी यांनी दुपारी प्रताप महाविद्यालयाच्या कार्यालयात ठिय्या मांडला होता. दुपारी प्राचार्यांनी १७ रोजी माहिती देण्याचे लेखी पत्र दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
कर्मचारी भरती प्रकरण न्यायप्रविष्ट झाले असल्याने कायदेशीर बाबी तपासून माहिती द्यावी लागेल.
-ज्योती राणे, प्राचार्य, प्रताप महाविद्यालय, अमळनेर