लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : शासनाचे लॉकडाऊन, प्रशासकीय अधिकाऱ्यांची कठोर अंमलबजावणी, डॉक्टरांची मेहनत या समन्वयामुळे अमळनेर तालुक्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्ण अर्ध्या टक्क्यांवर आली आहे. सहा कोविड रुग्णालयात रुग्ण संख्या शून्यावर आल्याने जनतेसह रात्रंदिवस परिश्रम घेणाऱ्या डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. यामुळे एक्सरे, ऑक्सिजन, रेमडेसिविर,सीटी स्कॅन यासाठी भटकंती थांबली आहे.
तालुक्यात ११ कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. त्यात २७२ रुग्णांची क्षमता होती मात्र गंभीर परिस्थितीत क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात रुग्ण दाखल करण्याची वेळ आली होती. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मृत्यूदर देखील शून्यावर आला आहे. प्रांताधिकारी सीमा अहिरे, डीवायएसपी राकेश जाधव,तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ,मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांच्यासह सर्व कर्मचारी पथक रस्त्यावर उतरून दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे गर्दी ओसरू लागली होती. लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी काटेकोर झाली त्यामुळे शासकीय कोविड रुग्णालय इंदिरा भुवन ,डॉ. किरण बडगुजर, डॉ. हेमंत कदम, डॉ. चव्हाण, डॉ. विनोद पाटील यांच्या कोविड सेंटरला रुग्ण संख्या शून्य झाली आहे. उर्वरित ५ कोविड सेंटरला ३० रुग्ण उपचार घेत आहेत त्यात ग्रामीण रुग्णालयात १० रुग्ण असून ३ गंभीर आहेत.
पॉझिटिव्हिटी अवघी अर्धा टक्का आहे. ग्रामीण भागात २६२ पैकी १ तर शहरी भागात ५०२ पैकी ३ पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णसंख्या कमी झाली तसेच रेमडेसिविर तुटवडा देखील संपला आहे, एक्सरे मशीन आणि एचआर सीटी स्कॅनिंग देखील करण्याची गरज आता भासत नाही. ऑक्सिजन तुटवडा संपला आहे.
-डॉ. संदीप जोशी, अमळनेर.
ग्रामीण भागातीलही संसर्ग कमी झाला आहे. एक कोविड हेल्थ आणि एक कोविड केअर सेंटर बंद केले आहे. नियमांच्या पालनाने सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.
-डॉ. प्रकाश ताडे, अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय.
रुग्ण संख्या आणि मृत्यू शून्य येईपर्यंत कारवाई सुरूच राहणार आहे नागरिक, दुकानदारांनी नियमांचे पालन करावे. पुढचा धोका आपल्याच लहान मुलांना आहे, हे लक्षात घ्यावे.
-सीमा अहिरे, प्रांताधिकारी, अमळनेर
म्हसवे येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण
पारोळा : शहरासह तालुक्यात दि. २० रोजी एकूण ३३० लोकांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्यात. यात फक्त म्हसवे, ता. पारोळा येथे एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. यामुळे कोरोनाची लाट ओसरत असल्याचे चित्र अहवालावरून पाहण्यास मिळत आहे. यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे.