चाळीसगाव : दोनशे, तीनशे व चारशे कि.मी. बीआरएम सायकल स्पर्धेत यशस्वी झालेल्या चाळीसगावच्या तिघा सायकलवीरांनी शुक्रवारी धुळे येथे होणा-या सहाशे कि.मी. बीआरएम स्पर्धेसाठी सायंकाळी साडेपाच वाजता प्रस्थान केले. बीआरएमचा मराठी अर्थ 'जगभर रपेटीला कुठेही जाणारा असा आहे. ' ही स्पर्धा शनिवारी सहा वाजता धुळे येथील देवपूर बसस्थानकापासून सुरू होत आहे. यावेळी यासायकलवीरांना चाळीसगाव सायकलिंग गृपतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.४५ वर्षीय टोनी पंजाबी, ४३ वर्षीय अरुण महाजन व ५९ वर्षीय रवींद्र पाटील यांनी नुकतीच ४०० कि.मी. बीआरएम सायकलिंग स्पर्धा २४ तासात पूर्ण केली होती. यासाठी २७ तासाचे टार्गेट दिले होते. धुळेकडे स्पर्धेसाठी रवाना होताना शुभेच्छा देण्यासाठी वास्तूरचनाकार सुनील बंग, अनिल बंग, सायकलिस्ट सोपान चौधरी, कवी व साहित्यिक जिजाबराव वाघ आदी उपस्थित होते. आज सहाशे कि.मी.साठी मारणार पायंडलदोनशे, तीनशे आणि चारशे कि.मी.चे अंतर पार केल्यानंतर टोनी पंजाबी, रवींद्र पाटील, अरुण महाजन यांच्या सायकली १३ रोजी धुळे येथून ६०० कि.मी. बीआरएमसाठी धावणार आहेत. धुळे येथून सकाळी सहा वाजता स्पर्धेची शिट्टी वाजेल. मध्य प्रदेशातील टिकरीपर्यंत जाऊन आल्यानंतर नाशिककडे आगेकूच करायची आहे. नाशिकहून पुन्हा धुळे गाठून ४० तासात ६०० कि.मी.चा पल्ला या सायकलवीरांना गाठायचा आहे. विशेष म्हणजे ४०० कि.मी.ची स्पर्धा झाल्यानंतर अवघ्या चारच दिवसात ते ६०० कि.मी. स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. गेले चार दिवस तिघांनी पुन्हा दरदिवशी १०० कि.मी.चा कसून सराव केला.
चाळीसगावचा झेंडा रोवणार६०० कि.मी.ची सायकल बीआरएम यशस्वी केल्यानंतर आम्हाला एसआर अर्थात सुपर राईंडरचा किताब मिळणार आहे. आम्ही स्पर्धा जिंकून यशाचा झेंडा फडकवूच. एसआरच्या मानाचा तुरा देखील चाळीसगावच्या मुकूटात खोवण्यासाठी आम्ही आतूर आहोत.- टोनी पंजाबी, रवींद्र पाटील, अरुण महाजन, हौशी सायकलिस्ट, चाळीसगाव