पोलिसांची गस्त म्हणून आपली झोप मस्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:17 AM2021-09-19T04:17:39+5:302021-09-19T04:17:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रोजच होणाऱ्या चोऱ्या, घरफोड्या, हाणामारीच्या घटनांनी सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे गुन्हेगारांवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रोजच होणाऱ्या चोऱ्या, घरफोड्या, हाणामारीच्या घटनांनी सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसावा व चोरी, घरफोड्यांच्या घटनांना आळा बसावा, या उद्देशाने रात्री शहरातील सहाही पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठांसह कर्मचाऱ्यांकडून गस्त घालण्यात येत आहे. दरम्यान, रात्री बारानंतर काहीही कारण नसताना रस्त्यावर फिरणाऱ्या रिकामटेकड्यांचीच संख्या अधिक आढळत असून, यामध्ये ट्रीपलसीट फिरणाऱ्यांचा समावेश अधिक असल्याची बाब ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत पाहायला मिळाली.
म्हणून आपली झोप मस्त...
रात्री गस्तीवरील पोलिसांकडून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची व वाहनधारकांची थांबवून चौकशी केली जाते. गल्लीबोळात संशयितरित्या फिरणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेऊन संपूर्ण चौकशी केल्यानंतर सोडले जाते. दुसरीकडे अनेकदा चोरट्यांचा चोरीचा डाव पोलिसांकडून उधळला जातो. पोलिसांच्या गस्तीमुळे रात्री नागरिकांची शांत झोप होत आहे. काही दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलिसांनी संशयितरित्या फिरणाऱ्या तरूणाला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीअंती तो घरफोडीच्या उद्देशाने फिरत असल्याची बाब समोर आली होती.
रिकामटेकड्यांची संख्या जास्त !
रामनगर - वेळ - १२. १५
रात्री १२ वाजता ईच्छादेवी परिसरातील शहीद अब्दुल हमीद चौक परिसरात एका व्यक्तीचे निधन झाल्यामुळे नातलगांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर १२.१५च्या सुमारास गस्तीवरील पोलिसांना राम नगरात वाद झाल्याचे कळताच, पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्याठिकाणी गणेश मंडळातील स्पीकर बंद केल्याच्या कारणावरून प्रचंड गोंधळ झालेला बघायला मिळाला तर घटना काय घडली ते नागरिक पोलिसांना सांगत होते. नंतर पोलिसांनी गोंधळ शांत केला.
डी-मार्ट परिसर : वेळ - १२.४५
डी-मार्ट परिसरात एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे गस्तीवरील पथक पाहायला मिळाले. या भागात शुकशुकाट होता तर कारण नसताना काही तरूण दुचाकीवरून फिरताना दिसले. स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक तसेच ईच्छादेवी चौक परिसरातही तरूण ट्रीपलसीट फिरताना दिसले.
श्री संत कंवरराम नगर : वेळ - ०१.००
पंचमुखी हनुमान मंदिराकडून सिंधी कॉलनीकडे एक रिक्षाचालक जोरजोरात टेप वाजवून येत होता. संत कंवरराम नगरजवळ पोलिसांना पाहून रिक्षाचालकाने चक्क पुन्हा रिक्षा वळवून पंचमुखी हनुमान मंदिराच्या दिशेने धूम ठोकली. त्यानंतर संत कंवरराम नगरातील गल्ली-बोळांमध्ये रिकामटेकडी मुले कट्ट्यांवर बसलेली आढळली. त्यांना घरी जा, असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. तर काही गणेश मंडळांच्याबाहेर कार्यकर्त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. पांडे चौक परिसरात काही तरूण ट्रीपलसीट फिरताना दिसले.