ममुराबाद, ता. जळगाव : कोरोनाच्या साथीमुळे महसूल व पोलीस प्रशासनाकडून गिरणा नदीतील वाळू तस्करांच्या विरोधातील धडक मोहीम काही दिवसांपासून थांबविण्यात आली आहे. त्याचा फायदा उचलून संबंधितांनी पुन्हा एकदा वाळूची तस्करी वाढवली असून चोरट्या मार्गाने चालणाऱ्या वाहतुकीमुळे परिसरातील ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत. तस्करांना कोणाचाच धाक शिल्लक राहिला नसल्याचे बोलले जात आहे.जिल्ह्यातील वाळू ठेक्यांची मुदत संपल्यानंतर नवीन ठेके देण्याची प्रक्रिया आणखी लांबणीवर पडली आहे. दरम्यान, तापीसह बोरी, गिरणा आदी नद्यांमधील अवैध वाळूउपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पात्रांमध्ये डंपर तसेच ट्रॅक्टरसारखी वाहने नेण्यास काही महिन्यांपूर्वी बंदी घातली होती. त्यानंतरही वाळूतस्करी नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात घेऊन स्वत: जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधिक्षक यांनी कारवाईचे पाऊल उचलले होते. विशेषत: गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे त्यामुळे दणाणले होते. मात्र, सध्या महसूल किंवा पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने वाळू तस्करांची हिंमत चांगलीच वाढली आहे. दिवसाढवळ्या वाळूचे वाहन भरताना थोडी मर्यादा येत असल्याने त्यांच्याकडून मध्यरात्रीनंतर वाहनांमध्ये वाळू भरण्याचा कार्यक्रम सुरू केला जातो. त्यानंतर वाळूने भरलेली वाहने मधल्या कमी अंतराच्या व फार वर्दळ नसलेल्या रस्त्याने भरधाव वेगाने पळवली जातात.सध्या गिरणा पात्रातून भरलेले वाळुचे ट्रॅक्टर मोठ्या संख्येने ममुराबादमार्गे असोदा-भादलीकडे धावताना दिसत आहेत. काही ट्रॅक्टर याचमार्गे पुढे जळगाव शहराकडेही रवाना केली जात आहेत. महसूल विभागाच्या तलाठी व संबंधित अधिकाºयांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.भरधाव ट्रॅक्टरमुळे ग्रामस्थ भयभीतगिरणेच्या पात्रातील वाळू रात्रीच्या अंधारात मजुरांकडून भरल्यानंतर दिवस उगविण्याच्या आधी मागणी असलेल्या गावी ट्रॅक्टर पोहोचविण्याची जबाबदारी चालकाच्या अंगावर तस्करांनी टाकलेली असते. त्यामुळे ठरलेल्या गावात शक्य तितक्या लवकर पोहोचण्याच्या धडपडीतून हे चालक ट्रॅक्टर बेफाम होऊन पळविताना दिसून येतात. वाळुने काठोकाठ भरलेले ट्रॅक्टर रात्रीच्या अंधारात गल्लीबोळातून भरधाव वेगाने धावत असल्याचे पाहून ग्रामस्थांच्या छातीत धडकी भरल्याशिवाय राहत नाही. अनेकांची झोप त्यामुळे उडालीदेखील आहे.-वाळू तस्करांनी गावागावात कमिशन तत्त्वावर काही हस्तक नेमले आहेत. त्यांच्याकडून आधी वाळूची मागणी नोंदवली जाते. त्यानुसार त्या गावांना वाळूने भरलेले ट्रॅक्टर रात्री रवाना केले जाते.-महसूल विभागाच्या स्थानिक अधिकाºयांना चिरीमिरी देऊन खूष ठेवले जाते. त्यामुळे रात्री गिरणेच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळुचे उत्खनन सुरू असले तरी त्याकडे मुद्दाम कानाडोळा केला जातो.-वाळूची विक्री करताना एका ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी साधारण तीन ते साडेतीन हजार रुपयांचा दर आकारला जातो. जास्त मागणी असल्यास त्यात थोडीफार कपात केली जाते.
गिरणा नदीच्या पात्रातून रात्रंदिवस वाळूची तस्करी जोरात सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 12:22 PM