... म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराची खडसेंविरुद्ध माघार, पवारांनी सांगितली 'अंदर की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 09:42 AM2019-10-09T09:42:23+5:302019-10-09T09:42:43+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र बदलले
जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने कोथरुड मतदारसंघातून माघार घेतली होती. त्यानंतर, खडसेंच्या कन्या निवडणूक लढवत असलेल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अॅड. रवींद्र पाटील यांनीही धक्कादायक माघार घेतली आहे. पक्ष आदेश असल्याने माघार घेण्याचे त्यांनी सांगितले. याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना पवारांनी याचं कारण सांगितलं. राज्यातील काही मतदारसंघातून अशा उमेदवारी माघार घेण्यात आल्याचे पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र बदलले असून, शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील यांची आता माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या भाजप उमेदवार रोहिनी खडसे यांच्यात सरळ-सरळ लढत रंगणार आहे. दुसरीकडे पक्षाकडून माघारीचे आदेश आल्याने स्वत: रवींद्र पाटील हे पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठविणार असल्याची भूमिका मांडली होती. तर राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी विनोद तराळ यांनी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या जळगाव दौऱ्यात विधासनभा निवडणुकांमधील माघार याबद्दल भाष्य केले.
यंदाची विधानसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची असून एकेक जागा महत्त्वाची आहे. भाजपा-सेनेला पराभूत करणे आमचं प्रमुख लक्ष्य आहे. त्यामुळे रवींद्र पाटील यांना आम्ही उमेदवारी माघारी घेण्याची विनंती केल्याचं पवार यांनी सांगितलं.