...तर पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:12 AM2021-06-03T04:12:23+5:302021-06-03T04:12:23+5:30
शहरातील वाढणाऱ्या गर्दीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला इशारा : महापालिकेत व्यापारांसोबत घेतली बैठक : रस्त्यावर व्यवसाय करण्यास हॉकर्सला बंदी लोकमत ...
शहरातील वाढणाऱ्या गर्दीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला इशारा : महापालिकेत व्यापारांसोबत घेतली बैठक : रस्त्यावर व्यवसाय करण्यास हॉकर्सला बंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दोन महिन्यांनंतर शहरातील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली, तरी निर्बंधांचे काटेकोर पालन या दोन दिवसांत झालेले दिसून येत नाही. शहरातील वाढत जाणाऱ्या गर्दीमुळे पुन्हा कोरोनाची तिसरी लाट निर्माण होऊ शकते. शहरातील वाढलेली गर्दी ही चिंताजनक असून, गर्दीचे हेच प्रमाण कायम राहिल्यास पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.
बुधवारी महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व व्यापाऱ्यांना हा इशारा दिला आहे. शहरातील दुकाने पुन्हा उघडण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, पहिल्या दोन दिवसांत नियमांचे पालन होताना दिसून येत नसल्यामुळे व बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत असल्यामुळे, बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील व्यापाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह शहरातील विविध मार्केटमधील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. व्यापाऱ्यांच्या मागणीप्रमाणे व व्यापाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे जिल्हा प्रशासनाने शहरातील दुकाने उघडण्यास पुन्हा परवानगी दिली असली तरी शहरात पुन्हा नियमांचे पालन होत नसल्याचे आढळल्यास प्रशासनाला नाइलाजास्तव पुन्हा कडक निर्बंध लागू करावे लागतील, असा इशारादेखील या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.
रस्त्यावर व्यवसाय करताना आढळल्यास हॉकर्सचे साहित्य होणार जप्त
शहरातील हॉकर्सला मनपा प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊनदेखील त्या सूचनांचे पालन केले जात नसल्याचे आढळून येत आहे. मनपा प्रशासनाने निश्चित केलेल्या जागांवर जर शहरातील हॉकर्स व्यवसाय करीत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिले आहेत. शहरातील कोणत्याही रस्त्यावर हॉकर्सने दुकाने थाटल्यास सर्व साहित्य व हातगाड्या जप्त केल्या जातील असाही इशारा मनपा प्रशासनाकडून या बैठकीत देण्यात आला आहे. शहरातील हॉकर्स मुख्य बाजारपेठ भागात व्यवसाय करीत असल्याने याच भागात एकाच वेळी हजारो नागरिकांची उपस्थिती होत असल्याने, कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने निश्चित करून दिलेल्या जागांवरच व निर्धारित वेळेतच व्यवसाय करण्याच्या सूचनादेखील आयुक्तांनी या बैठकीत दिल्या आहेत.
व्यापाऱ्यांना लसीकरण बंधनकारक
शहरातील सर्व मार्केट उघडण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, व्यापाऱ्यांनीदेखील नियमात राहून व्यवसाय करावा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. व्यापाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांसह आपल्याकडे काम करणाऱ्यांचेदेखील लसीकरण करून घ्यावे, अशा सूचनादेखील या बैठकीत देण्यात आल्या. यासाठी महापालिका प्रशासनाकडून लसीकरण केंद्र सुरू करण्यात येईल, असेही आश्वासन मनपा प्रशासनाकडून देण्यात आले आहे. यासाठी व्यापारी संघटना व असोसिएशनने कामगारांच्या याद्या मनपा प्रशासनाकडे सादर कराव्यात, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
या नियमांचे पालन करावे लागेल
1. दुकानांमध्ये सर्व ग्राहकांना मास्कशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये. दुकानात एकाच वेळी पाचपेक्षा जास्त ग्राहक असू नयेत.
2. दुकानांसमोर ग्राहकांना उभे राहण्यासाठी आखणी करून देण्यात यावी. दुकानातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण बंधनकारक असेल.
3. गर्दी झाल्यास संबंधित दुकानदारावर कडक कारवाई करण्यात येईल, तसेच गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक व्यापारी असोसिएशनने खाजगी सुरक्षादेखील उपलब्ध करून द्यावा.
व्यवसायाची वेळ वाढवून देण्याची मागणी
या बैठकीत व्यापारी असोसिएशनचे पुरुषोत्तम तावरी, ललित बर्डिया, अनिल कांकरिया यांनी प्रशासनाकडे व्यापाऱ्यांच्या काही मागण्या मांडल्या. यामध्ये दुकाने उघडण्याची वेळ कमी राहिल्यास ग्राहक एकाच वेळी गर्दी करू शकतात, यामुळे दुकाने उघडण्याची वेळ वाढवून देण्यात यावी, तसेच फुले मार्केटमध्ये जाण्यासाठी बंद केलेले सर्व प्रवेशद्वार उघडण्यात यावेत. व्यापाऱ्यांच्या लसीकरणासाठी मनपा प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था करून द्यावी, अशा मागण्या व्यापारी असोसिएशनतर्फे या बैठकीत जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या.