जळगावातील डॉक्टरांकडे लुटीसाठी धुळ्याहून आले चोरटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 12:52 PM2018-11-04T12:52:11+5:302018-11-04T12:52:59+5:30
दोघांना अटक
जळगाव : बालरोग तज्ज्ञ डॉ.निषाद यशवंत पाटील यांच्याकडे सव्वा पाच लाखाची लूट केल्याच्या प्रकरणात जाकीर पिरन खाटीक (वय ४०, रा. तांबापुरा) व मास्टर मार्इंड चेतन भागवत सूर्यवंशी (वय २७, रा. वाघनगर) या दोघांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. ही लूट करण्यासाठी जाकीर याने धुळे येथून खास दोघांना बोलावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
डॉ.आचल यांना चाकूचा धाक दाखवून पाच लाख रुपये रोख व दहा ग्रॅमची सोन्याची अंगठी लुुटल्यानंतर जाकीर खाटीक त्याचे साथीदार रियाज राजू खाटीक रमजान रहिम शेख (दोन्ही रा.धुळे) या तिघांनी त्याच दिवशी रात्री धुळे गाठले. पैशाची वाटणी झाल्यानंतर जाकीर हा जळगावला परत आला. तर अन्य दोघं गुजरातमध्ये रवाना झाले आहेत. पोलिसांचे एक पथक त्यांच्या मागावर आहे. चेतन याची उज्जैन येथे रेल्वेची परीक्षा असल्याने तो तेथे रवाना झाला होता.
चेतन गायब झाल्याने संशय
डॉक्टरांशी कोणाचे वैर किंवा कोणी काम सोडले आहे का याची पोलिसांनी माहिती घेतली असता चेतन याला कामावर काढल्याचे समोर आले. त्यानंतर त्याची चौकशी केली असता तो शहरातून गायब झाल्याचे लक्षात आल्याने त्याच्यावर संशय बळावला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी स्वत: रात्री एक वाजता घटनास्थळाला भेट दिली होती. जिल्हा पेठचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, सहायक निरीक्षक संदीप आराक, उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी, राजू मेढे, रवींद्र नरवाडे, छगन तायडे, प्रशांत जाधव, शेखर जोशी, हेमंत तायडे व प्रतिभा पाटील यांच्या पथकाने रात्रंदिवस या तपासात झोकून दिले होते. उपनिरीक्षक सूर्यवंशी यांना खबऱ्यामार्फत या गुन्ह्याचा धागा मिळाला अन् तपासात पुढे हा धागा गवसलाही.
मास्टर मार्इंडला मिळाले १० हजार; १ लाख १५ हजार जप्त
मास्टर मार्इंड असलेल्या चेतन याच्या बॅँक खात्यात जाकीर याने दहा हजार रुपये जमा केले आहेत. जाकीर याने पोलिसांना आतापर्यंत एक लाख १५ हजार रुपये काढून दिले आहेत. जास्त रक्कम फरार झालेल्या दोघांकडे असल्याचे जाकीर सांगतो. दरम्यान, चेतन उज्जैन येथून येताच त्याला ताब्यात घेण्यात आले तर जाकीर याला त्याच्याआधीच ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी वैद्यकिय तपासणीनंतर दोघांना अटक करण्यात आली.
कामावरुन काढून टाकल्याने आला राग
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चेतन सूर्यवंशी हा या गुन्ह्णातील मास्टर मार्इंड आहे. डॉ.निषाद पाटील यांच्याकडे तो जनसंपर्क अधिकारी म्हणून कामाला होता. मात्र रुग्ण आणत नसल्याच्या कारणावरुन डॉक्टरांनी त्याला कामावरुन काढले होते. हा राग मनात असल्याने बदला घेण्यासाठी चेतन याने डॉक्टरांना लुटण्याचा डाव आखला होता.
दसºयाच्या दिवशी रात्री रचला डाव
डॉक्टरांना अद्दल घडविण्याचा विचार चेतनच्या डोक्यात सतत येत होता. त्यासाठी आठ महिन्यापूर्वी चेतन याने तांबापुरातील जाकीर याला लुटीचा डाव सांगितला होता. डॉक्टरांकडे रोज व आठवड्याला किती पैसे येतात, घरी कोण असते याची इत्यंभूत माहिती त्याला होती. आठ महिने शांत राहिल्यानंतर दसºयाच्या रात्री पाच जणांनी मिळून डाव रचला. त्यात चेतन व जाकीर हे दोन्ही होते.