गैरसोय : मुंबईकडे जाणारी हावडा एक्स्प्रेस दोन दिवस पुन्हा रद्द
जळगाव : ‘यास’ चक्रीवादळामुळे रेल्वे प्रशासनाने खबरदारी म्हणून गुजरात, ओडिशा व पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या अनेक गाड्या चार दिवसांपासून रद्द केल्या असून, यातील मुदत संपलेल्या काही गाड्या पुन्हा तीन दिवस स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच जळगावमार्गे पश्चिम बंगालहून मुंबईकडे जाणारी हावडा-मुंबई एक्स्प्रेसही पुन्हा दोन दिवस रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे.
गेल्या महिन्यात कोरोनामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्यानंतर, आता ‘यास’ चक्रीवादळामुळे रेल्वे प्रशासनाने पुन्हा काही गाड्या रद्द केल्या आहेत. ‘यास’ चक्रीवादळ गुजरात आणि ओडिशाच्या किनारपट्टीवरून आता पश्चिम बंगालकडे वळत आहे. सुरुवातीला तीन दिवस या वादळाची तीव्रता फारशी नव्हती. त्यामुळे रद्द केलेल्या गाड्या पुन्हा सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाचे नियोजन होते. मात्र, पश्चिम बंगालकडे वळल्यानंतर या वादळाची तीव्रताही अधिक वाढली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने खबरदारी म्हणून बुधवारपासून पुढे तीन दिवस काही गाड्या पुन्हा रद्द केल्या आहेत.
दरम्यान, या रद्द केलेल्या गाड्यांच्या तिकिटांचा प्रवाशांना पूर्ण परतावा देण्यात येणार आहे. यासाठी प्रवाशांना स्टेशनवरील तिकीट खिडकीवर तिकीट दाखवून तात्काळ परतावा देण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
इन्फो :
या गाड्या पुन्हा स्थगित...
रेल्वे प्रशासनाने खबरदारी म्हणून पुन्हा स्थगित केलेल्या गाड्यांमध्ये गाडी क्रमांक (०२८२७) पुरी - सुरत एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ( ०८४०६) अहमदाबाद - पुरी एक्स्प्रेस व गाडी क्रमांक (०२२५६) कामाख्या एक्स्प्रेस ही गाडीही रद्द केली आहे. तसेच गाडी क्रमांक (०२८१०) हावडा-मुंबई एक्स्प्रेस व गाडी क्रमांक (०२१०२) हावडा-मुंबई विशेष एक्स्प्रेसही रद्द केली आहे. एकूण पाच रेल्वेगाड्या रेल्वे प्रशासनाने पुन्हा स्थगित केल्या आहेत.