भुसावळ : शहरांमध्ये घरफोडी व चोरीच्या घटना सातत्याने घडत असताना आता चोरट्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला असून तालुक्यातील किन्ही गावात रमेश गिरधर सुरवाडे यांच्या खळ्यातून दोन म्हशी चोरीस गेल्याची घटना २८ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. त्यांनी दोन दिवस आपल्या शेजारील गावांमध्ये म्हशींचा शोध घेतला मात्र त्याचा तपास न लागल्याने तालुका पोलीस ठाण्यात म्हशींच्या चोरीची नोंद करण्यात आली आहे.
किन्ही येथील रमेश सुरवाडे यांच्याकडे १५-२० म्हशी आहेत. ते गावातील गुरांच्या पाणी पिण्याच्या हौदाजवळ आपल्या म्हशी बांधतात. याठिकाणी रात्री कुणीही नसल्याच्या संधीचा फायदा घेऊन, खुटेंचा दोर कापून अज्ञान चोरट्यांनी ८० हजार रुपयांच्या दोन म्हशी लंपास केल्या. त्यांनी याबाबत शेजारी खडका, शिवपूर कन्हाळा या गावांमध्ये जाऊन म्हशींचा शोध घेतला; मात्र त्या मिळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार गणेश राठोड करीत आहे.
पशुपालन करणारे चिंतेत
शहरांमध्ये दुकाने व घरफोड्यांचे सत्र सुरूच असून आता चोरट्यांनी ग्रामीण भागामध्ये मोर्चा वळविला असून लाखो रुपये किमतीच्या गायी व म्हशी चोरीला जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे.
सध्या आधीच हाताला काम नाही व ज्या पशुंवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, तेच चोरीला जात असल्यामुळे शेतकरी व पशुपालन करणारे हवालदिल झाले आहेत. तर आता पावसाळा तोंडावर असून शेतकऱ्यांची मशागत कामाची लगबग सुरू झाली असून पशुधन चोरीला जात असल्यामुळे शेतीची कामे कशी होतील हाही मोठा प्रश्न समोर उभा ठाकला आहे.
वीज पंपासह शेती साहित्याची चोरी
अनेकांच्या शेतामध्ये असलेल्या वीज पंपाशिवाय ठिबकसाठी टाकण्यात आलेल्या केबल व इतर शेती साहित्याच्या चोरीच्या प्रमाणामध्येही वाढ होताना दिसून येत आहे. या चोरट्यांचा पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामीण भागातून आता होताना दिसून येत आहे.