सोनसाखळी लांबविल्याचा फोन अन् पोलिसांची भरउन्हात उडाली तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 04:02 PM2018-04-02T16:02:12+5:302018-04-02T16:02:12+5:30
असेही एप्रिल फुल ! : राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याने घेतली फिरकी
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१ : १ एप्रिल म्हणजे फिरकी घेण्याचा दिवस अर्थात एप्रिल फुल! रविवारी या एक एप्रिलच्या निमित्ताने शहरात अनेक गंमतीशीर किस्से घडले. रामेश्वर कॉलनीत सोनसाखळी चोरी व ही माहिती पोलिसांना देणाºया राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाºयाचा मृत्यू या दोन गंमतीशीर किस्स्यांनी जळगावकरांची दिवसभर करमणूक झाली.
रामेश्वर कॉलनीतील आदित्य चौकात दुचाकीस्वारांनी एका महिलेची सोनसाखळी लांबविल्याची माहिती एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाºयाने एमआयडीसी पोलिसांना दिली. ठाणे अंमलदाराने त्या फोनची दखल घेऊन तत्काळ गुन्हे शोध पथकाला घटनास्थळाकडे रवाना केले. सहायक फौजदार अतुल वंजारी यांचे पथक रखरखत्या उन्हात वर्णनावरून सोनसाखळी चोरांचा शोध घ्यायला लागले. घामाघूम झाल्यानंतरही चोरट्यांचा शोध लागेना. सर्वच ठिकाणाहून माहिती घेतल्यानंतर ‘एप्रिल फुल’ असल्याचे लक्षात आले. या महिलेवर संताप व्यक्त होत असतानाच त्यांच्या निधनाचे वृत्त धडकले.
पोलिसांनीही केले एप्रिल फुल
रामेश्वर कॉलनीत सोनसाखळी लांबविल्याची माहिती देऊन पोलिसांना भरउन्हात पायपीट करायला लावल्यानंतर चौकशीअंती संबंधित महिलेने एप्रिल फुल केल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनीही त्या महिलेला फोन करुन तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे दोन तासांनी चोरट्यांना शोधण्यात यश आले असून मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. तुम्ही फिर्यादी महिलेला घेऊन पोलीस ठाण्यात या असा निरोप देऊन पोलिसांनीही या महिलेला एप्रिल फुल केले.