वाडे येथील सोपान महाराज यांची आळंदी ते पंढरपूर पायी वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:27+5:302021-07-21T04:12:27+5:30
वाडे येथे घरी आल्यावर हभप सोपान पाटील महाराजांचा नागरिकांमार्फत सत्कार करण्यात आला. वाडे गावातील हभप सोपान महाराज पाटील हे ...
वाडे येथे घरी आल्यावर हभप सोपान पाटील महाराजांचा नागरिकांमार्फत सत्कार करण्यात आला. वाडे गावातील हभप सोपान महाराज पाटील हे वयाच्या ६व्या वर्षापासून पंढरपूरची पायी वारी करतात. त्यांचा हा नियम अखंड चालू होता, परंतु कोरोना महामारीमुळे माघी वारीला जाऊ शकले नाहीत आाणि याही वर्षी वारी होणार नाही, असे वाटले होते, पण आपला नियम खंडित होऊ नये, म्हणून सोपान महाराज घरून आळंदीला गेले. सर्व उपयुक्त साहित्य पाठीवर घेऊन अवघ्या ९ दिवसांत आळंदी ते पंढरपूर हे अंतर पायी चालत वारी पूर्ण केली.
सोपान महाराज वारी करून घरी आल्यानंतर ग्रामस्थांतर्फे त्यांचा पुष्पहार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ग.स. सोसायटीचे संचालक सुनील पाटील, वाडे येथील नेताजी सुभाष ग्राम वाचनालयाचे संचालक अशोक परदेशी, माजी सरपंच भरत मोरे, विकासोचे माजी संचालक बापू पाटील, लक्ष्मण पाटील, सेवानिवृत्त सैनिक एकनाथ माळी, मी वाडेकर ग्रुपचे जगतसिंग राजपूत, सामाजिक कार्यकर्ते विजयसिंग गोमलाडू, रामभाऊ धोबी, भीमसिंग परदेशी, रवींद्र माळी यांच्यासह नागरिकांनीही सोपान महाराज यांची भेट घेऊन दर्शन घेतले. यावेळी हभप पुरुषोत्तम पाटील, नामदेव पाटील आदी हजर होते.
200721\20jal_1_20072021_12.jpg
आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या हभप सोपान महाराज यांची भेट घेताना ग्रामस्थ.