रस्त्यांच्या प्रश्नावर मनपाची विशेष महासभा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:41 PM2020-09-10T12:41:19+5:302020-09-10T12:41:35+5:30
जळगाव : शहरातील रस्त्यांचा प्रश्न आता दिवसेंदिवस गंभीर होत जात असून, नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ...
जळगाव : शहरातील रस्त्यांचा प्रश्न आता दिवसेंदिवस गंभीर होत जात असून, नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिक व विरोधक व नागरिकांकडून सत्ताधाऱ्यांना चांगलेच टार्गेट केले जात आहे. तसेच ‘लोकमत’ ने देखील हा मुद्दा लावून धरला आहे. सत्ताधाऱ्यांनी आता रस्त्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी प्रभागनिहाय ५० लाख याप्रमाणे एकूण १० कोटींच्या निधीची तरतूद मनपाकडून केली जाणार असून, यासाठी मनपाकडून लवकरच विशेष महासभेचे नियोजन आखण्यात आले आहे.
मनपाकडून आता लवकरच रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, ही रक्कम कमी पडेल. त्यामुळे या निधीत ५ कोटींची वाढ करून प्रत्येक प्रभागात ५० लाख रुपयांच्या निधीतून रस्ते दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. मनपाकडून सध्या २४ लाखाच्या निधीतून रस्ते दुरुस्तीचे काम सुरु आहे. मात्र, यामध्ये कॉलनी भागातील रस्त्यांची दुरुस्ती होणे शक्य नाही. तसेच मुख्य शहरात ही या निधीतून किरकोळ दुरुस्ती केली जात आहे. त्यामुळे प्रभागनिहाय ५० लाखातून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे अशी मागणी पदाधिकाºयांकडून करण्यात आली होती. त्यामुळे आता १० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.या निधीबाबत महासभेत विशेष मंजूरी घेण्यात येणार आहे.
मनपात उद्या बैठक
शहरातील रस्त्यांबाबत एका एजन्सीने १०० कोटींचे नवीन रस्ते तयार करण्याचा प्रस्ताव मनपाला दिला आहे. तसेच ही रक्कम टप्प्या-टप्प्यात मिळाली तरी चालेल असे या एजन्सीचे म्हणणे आहे. याबाबत आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे यांच्यासह सर्वच पदाधिकारी आग्रही आहेत. या रस्त्यांच्या पार्श्वभूमीवर अंतीम चर्चा करण्यासाठी शुक्रवारी मनपात माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत मनपा आयुक्त देखील उपस्थित राहणार आहेत. नगरसेवकांकडून मुख्य रस्त्यांसह कॉलनी भागातील रस्त्यांचेही प्रस्ताव मागविण्यात आले असून, या प्रस्तावांवर देखील प्राथमिक चर्चा मनपाच्या बैठकीत होणार आहे.