गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥
जळगाव : अर्थ - गुरू हेच ब्रह्मा, गुरु हेच सर्वव्यापक भगवान विष्णु आणि गुरू हे शंकर आहेत. एवढेच नव्हे, तर ते साक्षात् परब्रह्म आहेत. अशा गुरूंना मी नमस्कार करतो.
हिंदु शास्त्रामध्ये वरील श्लोक सांगितला आहे. गुरूंशिवाय तरणोपाय नाही. ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरू आणि गुरूंचे निर्गुण रूप म्हणजे ईश्वर अशी अनेक वैशिष्ट्ये गुरूंबद्दल सांगता येतील. मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरूच असतात. अशा परमपूजनीय गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.
-तिथी - गुरुपौर्णिमा हा उत्सव सर्वत्र आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो. (तामिळ प्रदेशात व्यासपूजा ही ज्येष्ठ पौर्णिमेस साजरी करतात.)
- उद्देश - गुरू म्हणजे ईश्वराचे सगुण रूप. वर्षभर प्रत्येक गुरू आपल्या भक्तांना अध्यात्माचे बोधामृत भरभरून देत असतात. त्या गुरूंच्या प्रती अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करणे, हा गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागील उद्देश आहे.
-महत्त्व : गुरुपौर्णिमा या शुभदिनी दिवशी गुरुतत्त्व (ईश्वरी तत्त्व) नेहमीच्या तुलनेत एक सहस्र (हजार) पटीने कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेली सेवा आणि त्याग यांचा इतर दिवसांच्या तुलनेत एक सहस्र पटीने लाभ होतो, म्हणून गुरुपौर्णिमा ही गुरुकृपेची (ईश्वर कृपेची) एक अनमोल पर्वणीच आहे.
‘गुरू-शिष्य परंपरा’ ही हिंदूंची लक्षावधी वर्षांची चैतन्यमय संस्कृती आहे, परंतु काळाच्या प्रवाहात रज-तमप्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे या महान अशा गुरू-शिष्य परंपरेची उपेक्षा होत आहे. गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूपूजन होते, तसेच गुरू-शिष्य परंपरेची महती समाजाला सांगता येते.
थोडक्यात गुरूपौर्णिमा म्हणजे गुरु-शिष्य परंपरेचे जतन करण्याची सुसंधीच होय. गुरु-शिष्य अशा सुरेख संगमातून महान राष्ट्राच्या निर्मितीची अनेक उदाहरणे पुराण काळापासून इतिहासापर्यंत पहायला मिळतात. उदा. श्रीराम आणि वसिष्ठ, पांडव आणि श्रीकृष्ण. चंद्रगुप्त मौर्य यांना आर्य चाणक्य यांनी गुरू म्हणून मार्गदर्शन केले आणि एका बलशाली राष्ट्राची उभारणी केली.
निरूपण : सदगुरू नंदकुमार जाधव, सनातन संस्था