पाटणादेवीच्या पायी बाराव्या शतकातील दीपमाळींचे वैभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 07:31 PM2020-10-24T19:31:42+5:302020-10-24T19:34:28+5:30
बाराव्या शतकातील हेमाडापंथीय मंदिर कलेचा उत्तम नमुना असणा-या पाटणादेवीच्या पायी याच शतकातील पुरातन दोन दीपमाळीदेखील आहेत.
चाळीसगाव : बाराव्या शतकातील हेमाडापंथीय मंदिर कलेचा उत्तम नमुना असणा-या पाटणादेवीच्या पायी याच शतकातील पुरातन दोन दीपमाळीदेखील आहेत. महाराष्ट्रातील देवीच्या ५१ प्रमुख शक्तिपीठांपैकी पाटणानिवासिनी चंडिका मातेचे हे वरदहस्त शक्तिपीठ आहे. यंदा कोरोनामुळे मंदिर बंद असून नवरात्रोत्सवाचा जागरदेखील थांबला आहे. गेल्या अनेक शतकांपासून पुरातन दीपमाळींचे वैभव मात्र आजही टिकून आहे.
सह्यगिरीच्या पोटातून निघालेल्या डोंगररांगाची अभेद्य तटबंदी, वृक्षराजींचे हिरवेगार लावण्य, उंच कड्यांवरुन कोसळणारे शुभ्रधवल धबधबे, जंगली श्वापदांचा वावर, दुर्मिळ वनस्पती आणि पक्षांचा अधिवास. धवलतीर्थ धबधब्याचा मनोहारी प्रपात. पाटणादेवी परिसरात निसर्ग असा खुलून स्वागताला उभा राहतो. यापरिसराला खान्देशाचे नंदनवनही म्हटले जाते. साडेसहाशे हेक्टर परिसरात हा जंगल परिसर व्यापला आहे. शेजारीच औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा अभयारण्याचा परिसर असल्याने विपूल प्राणी संपदा येथे आढळते. देवीचे मंदिर आणि जंगल वैविध्यामुळे येथे वर्षभर पर्यटक, भक्तांचा राबता असतो. यावर्षी गेल्या सहा महिन्यांपासून पाटणादेवी परिसर कोरोनामुळे बंद आहे. दरवर्षी चंडिकामातेचा नवरात्रोत्स धुमधडाक्यात साजरा होतो. टाळेबंदीत हे सर्वच थांबले आहे.
वरदहस्त शक्तिपीठ, दीपमाळांचे अभिजात लावण्य
पाटणादेवीचे मंदिर हे बाराव्या शतकात उभारले गेले आहे. साधारण ११२८ हा मंदिर उभारणीचा काळ सांगितला जातो. राज्यभरातील देवीच्या प्रमुख ५१ शक्तिपीठांपैकी चंडिकादेवीचे हे वरदहस्त शक्तिपीठ आहे. यामुळे राज्यभरातुनच नव्हे तर परराज्यातूनही भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.
हेमाडपंथीय मंदिर स्थापत्यांचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या मंदिराच्या पायथ्याशी दोन मोठ्या दीपमाळीही उभारल्या आहेत. जवळपास ३० ते ३५ फूट त्यांची उंची आहे. कलाकुसरीच्या दीपमाळींमुळे मंदिराला अभिजात सौदर्य प्राप्त झाले आहे.
अल्लाउद्दीन खिजलीच्या आक्रमणात पाटणादेवी मंदिराची देखील नासधूस झाली होती. पुढे अहिल्याबाई होळकरांच्या काळात मंदिराची डागडूजी तर डाव्या हाताकडील दीपमाळीचा जीर्णोद्धार केला गेला. १९७२ मध्ये भारतीय पुरातत्व विभागानेदेखील दीपमाळींची दुरुस्ती करुन हे वैभव जपले.
दीपमाळी पेटविण्याचा मान न्हावे येथे पाटीलकी भूषविणा-या ठाकूर बांधवांना दिला गेला आहे. गेल्या काही पिढ्या त्यांनी तो निभावलाही. कालौघात पुरातत्व विभागाने दीपमाळी पेटविण्यास मनाई केली आहे.