शरद बन्सीधरणगाव, जि.जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. ग्रामीण भागात बाहेरुन आलेल्या लोकांचा सर्वे करणे तसेच किरकोळ आजारी असलेल्या रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना धीर देवून मनातील भीती दूर करण्याचे व कोरोनासंदर्भात काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्याचे व त्यांना रुग्णसेवा देण्याचे काम येथील भावी डॉक्टर करीत आहे. शुभम वसंतराव भोलाणे असे या भावी डॉक्टरचे नाव आहे. तो डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत आहे.आज ग्रामीण भागात व शहरी भागात अनेक डॉक्टरांनी रुग्णसेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णांचे हाल होत आहे. अशा परिस्थितीत मी उद्या डॉक्टर होणार असून, देशावर आलेल्या या संकटात मला काय योगदान देता येईल हा विचार करून तहसीलदारांशी चर्चा करून आपण स्वयंस्फूर्तीने हे काम, सरकारी यंत्रणेचा आधार न घेता करीत असल्याचे त्याचे म्हणणे आहे.त्याने तालुक्यातील गंगापुरी, पष्टाणे, सोनवद, कंडारी, महंकाळे, शामखेडा आदी गावात जाऊन विनामूल्य सर्वे करून रुग्णांना सेवा दिली आहे व पुढेही देणार आहे.शुभम हा येथील अॅड.वसंतराव व माजी नगरसेविका चंद्रकला भोलाणे यांचा मुलगा आहे.माझ्यासारखे फायनल इअरला असलेल्या अनेक भावी डॉक्टरांचा उपयोग सरकारने या एमर्जन्सीच्या काळात करुन घ्यायला हवा. यातून सरकारला मनुष्यबळ मिळेल व युवा डॉक्टरांना शिकण्याची संधी ही मिळेल.-शुभम भोलाणे, एमबीबीएस फायनल इअर, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय.
भावी युवा डॉक्टरची सामाजिक भान ठेवत ग्रामीण भागात स्वयंस्फूर्तीने रुग्णसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 6:46 PM