जळगाव : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांनी १६ खेळांच्या राज्य संघटनांना मान्यता दिली आहे पण संलग्नता प्रदान केलेली नाही. त्यामुळे या संघटनांकडून खेळणाऱ्या विद्यार्थी खेळाडूंना नोकरीत पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळत नाही. तसेच दहावी, बारावीला २५ गुणांना मुकावे लागते.
क्रीडा संघटनांना मिळणारी मान्यता आणि संलग्नता या दोन्हींमध्ये मोठा फरक आहे. त्याच्या राजकारणात विद्यार्थी खेळाडू भरडले जात आहेत. याविरोधात राज्य क्रीडा संघटनांच्या सचिवांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, पुणे यांची संलग्नता असल्याशिवाय त्या संघटनेमार्फत खेळणाऱ्या विद्यार्थी खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाअंतर्गत सरकारी नोकरीत संधी मिळत नाही, तसेच दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत २५ गुणांपासून वंचित राहावे लागते. खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रावीण्यप्राप्त केलेले असले, तरी त्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी होत नाही.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने २००८ रोजी, शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अनेक खेळांना संलग्नता दिली होती पण कालांतराने महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्यावतीने या राज्य संघटनांना केवळ मान्यतेचे पत्र देण्यात आले. यामुळे १६ क्रीडा संघटनांकडून खेळणाऱ्यांचे नुकसान होत आहे. यातील काही खेळ नॅशनल गेम्स, ऑलिम्पिक, एशियन गेम्स्, कॉमनवेल्थ गेममध्ये समाविष्ट आहेत.
केवळ मान्यता दिली म्हणजे...
क्रीडा संघटनांना केवळ मान्यता मिळाल्याने त्या क्रीडा स्पर्धा, शिबिरे यांचे आयोजन करू शकतात पण शासकीय योजना आणि दहावी व बारावीला गुणांचा लाभ विद्यार्थी खेळाडूंना मिळण्यासाठी या संघटनांना संलग्नता मिळणे आवश्यक असते, अशी माहिती क्रीडा भारती, जळगाव जिल्ह्याचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर यांनी दिली.
... तर मतदानाचा अधिकार मिळतो
संघटनेला संलग्नता मिळाल्यास त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. एका संघटनेकडे दोन मते असतात. त्यामुळे यामध्ये राजकारण न करता संबंधित खेळांच्या राज्य संघटनेला संलग्नता मिळावी, अशी मागणी राज्य संघटना सचिवांकडून होत आहे.
या खेळांच्या संघटना संलग्नतेच्या प्रतीक्षेत
बॉल बॅटमिंटन, बॉडी बिल्डिंग, कॅरम, सायकलिंग, ऊराष (मार्शल आर्ट प्रकार), मल्लखांब, नेट बॉल, आट्यापाट्या, रोलबॉल, सेपक टॅकरा, सॉफ्ट टेनिस, स्क्वॅश, रिंग टेनिस, थांग ता मार्शल आर्ट, टग ऑफ वॉर.