एस.टी. कॉलनीतील नागरिक आणि मुख्याधिकारी यांच्यात तू तू- मैं मैं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 11:24 PM2021-06-30T23:24:16+5:302021-06-30T23:24:16+5:30
वेळोवेळी निवेदने देऊनही गटारीचे काम होत नसल्याने संतप्त एसटी कॉलनीतील संतप्त महिला व नागरिकांनी थेट नगरपालिका मध्ये जाऊन सभागृहातच प्रवेश केला
लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : गेल्या सहा महिन्यापासून नगरपालिका प्रशासनाकडे बंद असलेले गटार सुरू व्हावी, यासाठी वेळोवेळी निवेदने देऊनही गटारीचे काम होत नसल्याने संतप्त एसटी कॉलनीतील संतप्त महिला व नागरिकांनी थेट नगरपालिका मध्ये जाऊन सभागृहातच प्रवेश केला आणि गटार बांधकाम का होत नाही, याबाबतीत मुख्याधिकारी यांना जाब विचारला त्यावेळेस विशेष सर्वसाधारण सभेत सभागृहात प्रवेश केल्याने मुख्याधिकारी व नागरिक यांच्या मध्ये चांगलीच ‘तू तू-मै मै’ झाली.
शहरातील महावीर नगर लगत असलेल्या एस.टी. कॉलनी मधीलसर्व रहिवासी महिला व नागरिकांनी सांडपाण्याची गटार व बंद असलेला रस्ता वापरण्यासाठी मोकळा करून मिळावा, यासाठी सहा महिन्यापासून वेळोवेळी स्वाक्षरी निशी निवेदने दिलेली आहेत. या निवेदनांना केराची टोपली दाखवल्याने व निवेदन देऊनही काम होत नसल्याने दिनांक ३० जून रोजी एस.टी. कॉलनीतील संतप्त महिला व नागरिकांनी थेट नगरपालिका गाठली.
नगरपालिकेतील सभागृहामध्ये विशेष सर्वसाधारण सभा सुरू असताना बळजबरीने प्रवेश करून नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी यांना निवेदनानुसार कामे का होत नाहीत? याबाबत जाब विचारला. त्यावेळेस मुख्याधिकारी अविनाश गांगोडे हेही संतप्त झाले. संतप्त महिला व नागरिक आणि मुख्याधिकारी यांच्यामध्ये ‘तू तू मै मै’ झाली. जवळपास अर्धा ते पाऊण तास हे सुरू होते. संतप्त ग्रामस्थ आणि संतप्त मुख्याधिकारी यांच्यात अर्धा तास रंगलेला कलगीतुरा नगराध्यक्षांसमोर रंगला.
अखेर संतप्त नागरिकांचा संताप पाहून बांधकाम विभागाचे अभियंता गवांदे यांनी एस.टी. कॉलनी मध्ये जाऊन उद्याच तुमची गटार मोकळी करून देतो, असे सांगितल्यानंतर वातावरण निवळले. अन्यथा नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना दोन दिवसाचा अल्टिमेटम दिलेला होता व होणाऱ्या विपरीत परिणाम सही नगरपालिका प्रशासनच जबाबदार असेल, असे ठणकावून सांगितले होते.
या आंदोलनात शुभम चौधरी, रमेश बडगुजर, राहुल अनिल चौधरी, बाबूलाल दयाराम बुवा, रवींद्र पाटील, राजेंद्र बडगुजर, विष्णू सिंधी, अमोल शिंदे, धनराज पाटील, विजय तापीराम बडगुजर, रमेश पंडित बडगुजर, चंपालाल छोटूलाल जयस्वाल, सुधाकर बाबुराव पाटील, बी. एच. पाटील, प्रा. चंद्रकांत रभाजी देवरे, कैलास माणिक बडगुजर, गणेश सोनार, किशोर रामदास बडगुजर या नागरिकांचा व त्यांच्या घरातील महिला सदस्यांचा समावेश होता.